Li Meizhen Chinese Runner completes Marathon during Periods video: ‘देव म्हणजे स्त्रीच!’ अशा शब्दांत चीनची मॅरेथॉन धावपटू ली मेइझेन हिचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आलं. मॅरेथॉन विश्वात मानवी जिद्द आणि चिकाटीचं एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळालं. २५ वर्षीय धावपटू ली मेइझेन हिने अत्यंत कठीण परिस्थितीत मॅरेथॉन पूर्ण करत जगभराचं लक्ष वेधून घेतलं. गेल्यावर्षीच्या हेंगशुई लेक मॅरेथॉनदरम्यान ली मेइझेन हिला अचानक मासिक पाळी सुरू झाली पण तरीही तिने शर्यत न थांबवता ती पूर्ण केली. २२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या या शर्यतीतील एक व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
२०२४ मध्ये चीनमधील हेबेई प्रांतात झालेल्या हेंगशुई लेक मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान शर्यतीच्या मध्यात ली मेइझेनची मासिक पाळी सुरू झाली. मात्र, या अनपेक्षित परिस्थितीतही तिने हार न मानता ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. तिच्या या जिद्दीमुळे जगभरात तिचं कौतुक झालं आणि क्रीडा क्षेत्रातील मासिक पाळीविषयी नव्याने चर्चा सुरू झाली.
मासिक पाळी सुरू होऊनही मॅरेथॉन केली पूर्ण; ली मेइझेनच्या जिद्दीने जगभरातील नेटकऱ्यांची मनं जिंकली
या कठीण शर्यतीदरम्यान तिच्या मासिक पाळीची स्पष्ट चिन्ह दिसत असूनही तिने स्पर्धा पूर्ण केली. अंतिम रेषेपासून सुमारे आठ किलोमीटर अंतर बाकी असताना ही परिस्थिती उद्भवली. शारीरिक वेदना आणि अस्वस्थता असूनही तिने स्पर्धेतून माघार घेण्यास नकार दिला आणि जिद्दीने शर्यत पूर्ण केली. तिच्या या कृतीने महिला खेळाडूंची शारीरिक आणि मानसिक ताकद, तसेच नैसर्गिक शारीरिक बदलांवर मात करून सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता अधोरेखित केली. ली मेइझेनची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
मॅरेथॉनच्या सुमारे ३४ ते ३५व्या किलोमीटरदरम्यान ली मेइझेनची मासिक पाळी सुरू झाली. ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉनमधील हा टप्पा सर्वाधिक कठीण मानला जातो, कारण याच वेळी धावपटूंना तीव्र थकवा आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. अशा निर्णायक क्षणी मासिक पाळी सुरू झाल्याने लीसमोर शारीरिक वेदना आणि मानसिक आव्हान उभं राहिलं. तिच्या पायावरून रक्त वाहत असल्याचं स्पष्ट दिसत असूनही, तसेच मासिक पाळीमुळे होणारा त्रास सहन करतही तिने हार मानली नाही. सर्व अडचणींवर मात करत तिने जिद्दीने शर्यत पूर्ण केली आणि आपल्या चिकाटीचा अनोखा परिचय करून दिला.
“मी शर्यत अर्धवट सोडली असती, तर मला पुन्हा एकदा मॅरेथॉन धावावी लागली असती,” असं ली मेइझेनने सांगितलं. अत्यंत कठीण परिस्थितीतही शर्यत पूर्ण केल्याबद्दल ली मेइझेनचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. अनेकांनी तिच्या धैर्याचं आणि चिकाटीचं अभिनंदन केलं. याशिवाय, सार्वजनिक स्तरावर आणि क्रीडा क्षेत्रात मासिक पाळीबाबत असलेला सामाजिक कलंक (Stigma) दूर करण्यासाठी तिची ही कामगिरी महत्त्वाची ठरल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
स्पर्धेदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये तिच्या पायावरून रक्त वाहत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तिच्या या चिकाटीचं आणि धैर्याचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.
