bजवळपास तीन आठवडे बेपत्ता असलेली चिनी टेनिसपटू पेंग श्वेइने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासोबत दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधल्याची माहिती देण्यात आली आहे.

पेंगने दोन आठवडय़ांपूर्वी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी उप-उच्चाधिकारी (व्हाइस प्रीमियर) झांग गाओली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता हे प्रकरण मिटवण्याचा चीन सरकार आणि ‘आयओसी’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘आयओसी’च्या माहितीनुसार, पेंग आणि बाख यांच्यात जवळपास ३० मिनिटे संवाद झाला. या वेळी आपण बीजिंग येथे आपल्या राहत्या घरी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पेंगने सांगितले; परंतु महिला टेनिस संघटनेचे (डब्ल्यूटीए) अध्यक्ष स्टीव्ह सायमन यांनी आधीच या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून ते यावर ठाम आहेत.

पेंग पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटेपर्यंत चीनमध्ये महिलांच्या टेनिस स्पर्धा आयोजित करणार नसल्याचे सायमन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाला नोव्हाक जोकोव्हिचसह अन्य आघाडीच्या पुरुष आणि महिला टेनिसपटूंनी समर्थन दर्शवले आहे. तसेच पुढील वर्षीच्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद चीनकडून काढूण घेण्यात यावे अशी मागणी होत असल्याने चिनी सरकार आणि ‘आयओसी’ला वेगाने हालचाली करणे भाग पडले आहे.