IPL 2026 Big Update on Chinnaswamy Stadium: आयपीएल २०२६ पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं होमग्राऊंड बदलणार असल्याची माहिती रिपोर्ट्समध्ये समोर आली होती. आरसीबीने २०२५ मध्ये जेतेपद पटकावलं होतं. हे जेतेपद पटकावल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संघ विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचला. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाल्याने आनंदावर विरजण पडलं. यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. यासंबंधित मोठी अपडेट आता समोर आली आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) ला कर्नाटक सरकारच्या गृह विभागाकडून बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामने आयोजित करण्यासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे. केएससीएचे अध्यक्ष बी.के. वेंकटेश प्रसाद कर्नाटकात आयपीएल परत आणण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. त्यांनी यासाठी राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. जेणेकरून सर्व सुरक्षा आणि प्रशासकीय चिंता दूर करता येतील.

दोन दिवसांपूर्वी, आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एआय-आधारित कॅमेरे बसवण्याची घोषणा केली. हे कॅमेरे प्रेक्षकांच्या हालचाली आणि गर्दी नियंत्रणावर चांगले लक्ष ठेवतील. स्टेडियमला सामने भरवण्याची परवानगी देण्यामागे या निर्णयाचा एक प्रमुख घटक म्हणून पाहिलं जात आहे. पण काही अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण झाल्यानंतरच ही मंजुरी पूर्णपणे अंमलात आणली जाईल.

केएससीएने आधीच एक्सपर्ट रिव्ह्यू समितीला एक तपशीलवार रोडमॅप सादर केला आहे, ज्यामध्ये सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रोटोकॉलशी संबंधित सर्व पैलूंचा समावेश आहे. केएससीएचे अधिकृत प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी माहिती दिली की, असोसिएशन सरकारने ठरवलेल्या सर्व अटी अत्यंत प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने अंमलात आणेल. दरम्यान, केएससीएचे अध्यक्ष प्रसाद लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये या मंजुरीशी संबंधित सर्व तपशील शेअर केले जातील.

आयपीएल २०२६ मध्ये, आरसीबी त्यांचे घरच्या मैदानावरील सर्व सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार की नाही, हा मोठा प्रश्न असेल. सर्व सामने बंगळुरूमध्ये किंवा काही सामने शहराबाहेर खेळवले जातील, अशी शक्यता असू शकेल. येत्या काही दिवसांत फ्रँचायझी हे स्पष्ट करेल अशी अपेक्षा आहे. कारण आता आयपीएल २०२६ सुरू होण्यास फक्त दोन महिन्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. या निर्णयानंतर, चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत येण्याच्या आशा मजबूत झाल्या आहेत, ज्यामुळे आरसीबी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.