गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि आरसीबी व्यवस्थापन यांच्यात यासंदर्भात सविस्तर चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाला याबाबत कल्पना देण्यात आली आहे. २८ मार्च रोजी होणारी सलामीची लढत चिन्नास्वामी स्टेडियमवरच होण्याची शक्यता आहे. आयपीएलचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. क्रिकइन्फोने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आरसीबीचे दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण स्टेडियम इथे होणार आहेत. छत्तीसगड सरकारशी यासंदर्भात बोलणं झालं असून त्यांनी पूर्ण पाठिंबा देऊ असं सांगितल्याचं आरबीसी व्यवस्थापनाने म्हटलं आहे.
बंगळुरू संघाने १८ वर्षांनी जेतेपद पटकावल्यानंतर आयोजित मिरवणुकीत चेंगराचेंगरीमुळे ११ जणांनी जीव गमावला होता. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी झाली. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात गर्दीच्या नियोजनासाठी यंत्रणा उभारणं आवश्यक असल्याचं स्पष्ट झालं. कर्नाटक सरकार, पोलीस, आरसीबी व्यवस्थापन यांच्यादरम्यान अनेक बैठका झाल्या. चाहत्यांना मैदानात सहजपणे जाता आणि येता यावं यासाठी प्रवेशद्वाराचा विस्तार करण्यात येत आहे. आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिकेला सहजपणे जाता येईल यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत.
आरसीबीने पुण्यात गहुंजे इथे तसंच मुंबईत डीवाय पाटील स्टेडियमवर सामने आयोजित करण्याचा विचार केला होता. मात्र दोन्ही ठिकाणांहून त्यांना हिरवा कंदील मिळाला नाही.
