Chris Gayle Instagram Post For Vaibhav Sooryavanshi: आयपीएल स्पर्धेत आधी षटकारांचा बादशहा म्हटलं, तर ख्रिस गेलचं नाव सर्वात आघाडीवर होतं. सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड असो किंवा सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड असो, हे सर्व रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहेत. वैभवने गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला. यादरम्यान त्याच्याकडे सर्वात वेगवान शतक झळकावण्याची देखील संधी होती. पण ही संधी अवघ्या ३ धावांनी हुकली. या खेळीनंतर ख्रिस गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करुन वैभवचं कौतुक केलं आहे.
ख्रिस गेलने आयपीएल २०१३ स्पर्धेत षटकारांचा पाऊस पाडत एकाच हंगामात ५९ षटकार खेचले होते. आतापर्यंत एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा गेलच्या नावे होता. पण १३ वर्षांनंतर १५ वर्षीय वैभवने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये ६५ षटकार खेचले आहेत. राज्स्थानचा पुढील सामना क्वालिफायर २ सामना असणार आहे. जर हा सामना जिंकला, तर राजस्थानचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे आणखी २ सामन्यात तो आणखी षटकार खेचू शकतो. वैभवची ही खेळी पाहून ख्रिस गेलला देखील आनंद झाला. त्याने स्टोरी शेअर करुन वैभवसाठी खास स्टोरी शेअर केली. जी सध्या जोरदार चर्चेत आहे.
वैभवसाठी ख्रिस गेलची खास स्टोरी
ख्रिस गेलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वैभवचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने, “धडाकेबाज वैभव सूर्यवंशी, एक नवीन सिक्सर मशीन”, असं लिहिलं आहे. यासह त्याने वैभवचा आत्मविश्वास वाढवून भविष्यवाणी देखील केली आहे. त्याचा २९ चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा अवघ्या ३ धावांनी हुकला. गेल म्हणाला, आता तो अपयशी ठरला, पण तो नक्कीच हा रेकॉर्ड मोडून काढेल.
आयपीएल २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा बोलबाला
वैभव सूर्यवंशीला गेल्या हंगामात मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली होती. पण या हंगामात त्याला पहिल्या सामन्यापासून डावाची सुरुवात करायची संधी मिळाली आहे. आतापर्यंत झालेल्या १५ सामन्यांमध्ये त्याने ६८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४५.३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर स्ट्राईक रेट २४२.८५ इतका राहिला आहे. यादरम्यान त्याने ४ अर्धशतक तर १ शतक झळकावलं आहे. तो २ वेळा ९० धावा करुन बाद झाला आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये ५५ चौकार आणि ६५ षटकार खेचले आहेत. त्याने २८० धावा या चौकार-षटकारांचा साहाय्याने केल्या आहेत.
