अ‍ॅमस्टरडॅम : ख्रिस्तियन एरिक्सनसोबत झालेल्या घटनेतून प्रेरणा घेणाऱ्या डेन्मार्कने युरो चषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतही स्वप्नवत कामगिरी केली. आक्रमणपटू कॅस्पर डोलबर्गने केलेल्या दोन गोलला जोकिम माहेल आणि मार्टिन ब्रेथवेट यांच्या प्रत्येकी एका गोलची बहुमोल साथ लाभल्यामुळे डेन्मार्कने शनिवारी वेल्सचा ४-० असा धुव्वा उडवून दणक्यात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अ‍ॅमस्टरडॅम येथे झालेल्या या सामन्यातील २७व्या मिनिटाला मिकेल डॅम्सगार्डने दिलेल्या पासचे डोलबर्गने गोलमध्ये रुपांतर करून डेन्मार्कला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्यातून मग वेल्सचे खेळाडू सावरूच शकले नाहीत. दुसऱ्या सत्रात डेन्मार्कने पुन्हा आक्रमणावर भर दिला. ४८व्या मिनिटाला वेल्सच्या बचावपटूंच्या चुकीचा फायदा उचलून डोलबर्गने संघासाठी तसेच वैयक्तिक दुसरा असा अप्रतिम गोल नोंदवला. जोकिम माहेलने ८८व्या मिनिटाला मॅथिआस जेन्सेनच्या पासवर डेन्मार्कसाठी तिसरा गोल केला.

मात्र यानंतरही समाधान न बाळगता भरपाई वेळेत (९०+४ मि.) अनुभवी मार्टिन ब्रेथवेटने डाव्या बाजूने आणखी एक गोल झळकावून डेन्मार्कच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. वेल्सच्या गॅरेथ बेलला या लढतीत फारशी छाप पाडता आली नाही. आता ३ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत डेन्मार्कसमोर नेदरलँड्स विरुद्ध चेक प्रजासत्ताक लढतीतील विजेत्याचे आव्हान असेल.