अफगाणिस्तानने भारतात टी२० मालिका आयोजित केली आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव खेळणं शक्य नसल्याने ते विविध ठिकाणी खेळतात. बीसीसीआयने नेहमीच त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे. याचाच भाग म्हणून राजधानी दिल्लीत तीन सामन्यांची टी२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळत असूनही पाहुणा असणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांनी अफगाणिस्तानच्या नेटक्या आयोजनाचं कौतुक केलं आहे.
दिल्लीत सामना असला की प्रदूषणामुळे चित्र धुरकट दिसतं. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स याचं कारण दिलं जातं. मात्र अफगाणिस्तानने याच दिल्लीत उत्तम प्रक्षेपण व्यवस्था अवलंबली. एरव्हीच्या तुलनेत दिल्लीत सामना असूनही चित्र स्वच्छ दिसत असल्याचा अनुभव अनेक चाहत्यांनी घेतला.
दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमची रचना बाकी मैदानांच्या तुलनेत वेगळी आहे. लांबच लांब सज्जे असं हे स्टेडियम आहे. त्या सज्ज्यांवर पानमसाल्याच्या जाहिराती असतात. बीसीसीआयला या जाहिरातीतून चांगला पैसा मिळतो. पानमसाले आरोग्याला धोकादायक असूनही त्याच्या जाहिरात्या का स्वीकारल्या जातात असा प्रश्न विचारला जातो. अफगाणिस्तान आयोजक असल्याने पानमसाल्याच्या जाहिराती काढून टाकण्यात आल्या.
सामन्याच्या पूर्वसंध्येला विजेत्या संघाला देण्यात येणाऱ्या चषकाचं अनावरण करण्यात आलं. निळ्या आणि पिवळ्या रंगाची झळाळती ट्रॉफी जेत्या संघाला देण्यात येणार आहे. सोव्हेनियर म्हणून जर्सी आणि टोपीचंही अनावरण करण्यात आलं. या मालिकेला फ्रेंडशिप सीरिज असं नाव देण्यात आलं आहे.
राजधानी दिल्लीतल्या लाजपत नगर भागात मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तान नागरिक राहतात. वैद्यकीय उपचार, शिक्षण, नोकरी यानिमित्ताने अफगाण माणसं दिल्लीत राहतात. या भागात अफगाणी पद्धतीचं खाणं पुरवणारी असंख्य हॉटेल्सही आहेत. ही मालिका दिल्लीत आयोजित करण्याचं हे प्रमुख कारण आहे.
अफगाणिस्तानने सुरुवातीला त्यांचे सामने दुबईत खेळले. यानंतर बीसीसीआय आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डात सामंजस्य करार झाला. ग्रेटर नोएडातलं स्टेडियम अफगाणिस्तान संघाचं होम ग्राऊंड झालं. मात्र एका बेकायदेशीर लीगच्या आयोजनाप्रकरणी या मैदानावर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर अफगाणिस्तान संघाने डेहराडून आणि लखनौ इथे सामने आयोजित केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी दुबईकडे मोर्चा वळवला. या मालिकेच्या निमित्ताने अफगाणिस्तानने भारतात भारताविरुद्ध मालिका आयोजनाचं शिवधनुष्य पेललं आहे.
दरम्यान पहिल्या टी२० लढतीत अफगाणिस्तानने अडखळत सुरुवातीनंतर १५६ धावांची मजल मारली. अभिषेक शर्माच्या तडाखेबंद खेळीसमोर अफगाणिस्तानचा संघ निष्प्रभ ठरला.
