आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कोलकाताने बंगळुरूला ४ गडी आणि २ चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवानंतर विराट कोहलीचं आयपीएल चषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा हा शेवटचा सामना होता. यानंतर विराट संघाचं नेतृत्व करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. मात्र असं असलं कोहलीचं कर्णधारपद स्वीकारण्यापासून ते सोडण्यापर्यंत एक योगायोग समोर आला आहे.

विराट कोहली २००८ पासून आयपीएल खेळत आहे. पहिल्या सिझनपासून विराट कोहली बंगळुरू संघासोबत आहे. पहिले दोन सिझन फ्रेंचाइसीने त्याला रिटेन केलं. त्यानंतर २०११ मध्ये पहिल्यांदा बंगळुरूचं कर्णधारपद भुषवण्याची संधी मिळाली. डेनियल विटोरीला आराम दिल्यानंतर त्याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. कर्णधार म्हणून २०११ मध्ये पहिला सामना होता. हा सामना बंगळुरू आणि राजस्थान या दोन संघात खेळला गेला. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमवून १४६ धावा केल्या होत्या. तर बंगळुरुने हे आव्हान १७ षटकात एक गडी गमवून पूर्ण करत सामना जिंकला होता. या सामन्यात बंगळुरूच्या ख्रिस गेलने ४४ चेंडूत ७७ धावा केल्या. तर तिलकरत्नने ३८ धावांची खेळी केली. एक गडी बाद झाल्यानंतर कोहली मैदानात उतरला आणि ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी केली आणि बंगळुरुने हा सामना ९ गडी राखून जिंकला.

आयपीएल २०२१ स्पर्धेतही विराटने कर्णधार म्हणून कोलकाता विरुद्ध शेवटचा सामना खेळला. या सामन्यात विराटने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या. हा योगायोग असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, आयपीएल २०११ मध्ये ५८ वा सामना बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यात झाला होता. तेव्हा बंगळुरूला कोलकाताने चार गडी राखून मात दिली होती. आता २०२१ आयपीएल स्पर्धेतही कोलकाताने चार गडी राखून मात दिली.

२०१३ मध्ये विटोरीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. आता कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर फ्रेंचाइसीला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे.