‘तो झंझावाती फॉर्मात आहे. त्याचं वय फार नाही, फिट आहे. त्याला परत बोलवा. दक्षिण आफ्रिकेने एकदाही वर्ल्डकप उंचावलेला नाही. तो दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप मिळवून देऊ शकतो’, अशा शब्दांत इंग्लंडचा माजी धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनने आपल्या भावना व्यक्त केल्या. आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा हुकूमी एक्का असलेल्या हेनरिच क्लासनबद्दल पीटरसन बोलत होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुकाबल्यात हैदराबादने २४३ धावांचं आव्हान पार केलं. हे करताना क्लासनने धावगतीचं दडपण वाढत असतानाही ३० चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६५ धावांची खेळी केली होती. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी या विजयाचा पाया रचला होता मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर हैदराबादची लय हरपली होत. क्लासनने सगळी सूत्रं हाती घेत, नितीश रेड्डी आणि त्यानंतर सलील अरोराच्या साथीने संस्मरणीय विजय मिळवून दिला.

प्रतिस्पर्धी संघातील तुल्यबळ गोलंदाज, प्रचंड उकाडा आणि आर्द्रता यांचा सामना करत क्लासनने अविस्मरणीय अशी खेळी साकारली. ही खेळी पाहूनच पीटरसनने एक्स अकाऊंटवर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला आवाहन केलं आहे. ‘हेनरिच अफलातून अशा फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेने आजवर एकदाही वर्ल्डकप पटकावलेला नाही. हेनरिच दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप मिळवून देऊ शकतो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. पण त्याला परत बोलवा. पुढचा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे इथेच होणार आहे. घरच्या मैदानावर हेनरिच देशवासीयांचं वर्ल्डकपचं स्वप्न साकार करू शकतो. अजूनही उशीर झालेला नाही, तो फिट आहे आणि सर्वोत्तम फॉर्मात आहे. त्याला परत येण्याचं आवाहन करा. त्याच्या समावेशाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बळकटी प्राप्त होईल’, अशी भावनिक पद्धतीने पीटरसनने लिहिलं आहे.

आयपीएल स्पर्धेत वादळी खेळींसाठी प्रसिद्ध फिनिशर अशी क्लासनची ओळख आहे. गेल्या वर्षी ३३व्या वर्षी क्लासनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. ‘दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान आहे आणि राहील. टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व करता आलं ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक हे अतिशय व्यग्र स्वरुपाचं असतं. सातत्याने खेळल्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. मी माझ्या कुटुंबीयांना वेळ देऊ इच्छितो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय अजिबात सोपा नव्हता. अनेक महिने विचार केल्यानंतर मी या निर्णयाप्रत पोहोचलो आहे. माझ्या वाटचालीत घरचे, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू, क्रिकेट साऊथ आफ्रिका यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मी देशासाठी खेळू शकलो. पण आता थांबण्याची वेळ आली आहे’, असं हेनरिचने निवृत्तीवेळी म्हटलं होतं.

हेनरिच आता आयपीएलसह जगभरातल्या काही लीगमध्ये खेळतो. वर्षभरापैकी सहा महिने तो खेळतो. उर्वरित वेळ तो आपल्या कुटुंबाला देतो. क्रिकेट साऊथ आफ्रिकेशी करारबद्ध असता तर हेनरिचला संपूर्ण वर्षभर खेळावं लागलं असतं. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यामुळे कुठल्या लीगमध्ये खेळायचं हे हेनरिच स्वत:ठरवतो. त्यासाठी तयारी करतो. निम्मं वर्ष खेळून वर्षभराची पुंजी तो कमावतो. स्पर्धेदरम्यान त्याची पत्नी, मुलं बरोबर असतात.

कोटीच्या कोटी उड्डाणे!

हेनरिचचा आयपीएल प्रवास स्तिमित करणारा आहे. २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने स्टीव्हन स्मिथ दुखापतग्रस्त झाल्याने हेनरिचला बदली खेळाडू म्हणून संघात घेतलं होतं. तेव्हा त्याचं मानधन ५० लाख रुपये होतं. पुढच्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५० लाख रुपये मोजून त्याला संघात घेतलं. मात्र वर्षभरात बंगळुरू संघाने त्याला रिलीज केलं. २०१९च्या अखेरीस झालेल्या लिलावात हेनरिच अनसोल्ड ठरला. कोरोना काळात झालेल्या आयपीएलमध्ये हेनरिच कोणत्याही संघाचा भाग नव्हता. २०२३ हंगामासाठीच्या लिलावात हेनरिचचं नाव होतं. त्याची बेस प्राईज होती १ कोटी. तडाखेबंद फटकेबाजी, आवश्यकता भासल्यास विकेटकीपिंग आणि कर्णधारपदाचा अनुभव यासाठी हैदराबादने ५.२५ कोटी रुपये खर्चून क्लासनला ताफ्यात समाविष्ट केलं. त्यावर्षी क्लासनने १२ सामन्यात १७७च्य स्ट्राईकरेटने ४४८ धावा चोपून काढल्या. यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. २०२४ हंगामातही क्लासनची बॅट तळपली. त्याने १६ सामन्यात ४७९ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादने लिलालापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा केली. यामध्ये हेनरिच्या मानधनात प्रचंड वाढ करण्यात आल्याचं दिसून आलं. तब्बल २३ कोटी रुपये खर्चून हेनरिचला सनरायझर्स आपल्याकडे राखलं. कर्णधार पॅट कमिन्सपेक्षाही हेनरिचचं मानधन जास्त आहे. हेनरिचचं महत्त्व किती आहे हे सनरायझर्स संघाच्या कृतीतून दिसून आलं. ५.२५ कोटींवरून हेनरिचचं मानधन २३ कोटी एवढं प्रचंड झालं. हैदराबाद संघात सर्वाधिक मानधन हेनरिचचं आहे. यासंदर्भात हेनरिचने आपल्या भावना व्यक्त केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघाने माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. मी यासाठी त्यांचा सदैव ऋणी असेन असं हेनरिच मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बोलला होता. २०२५ हंगामात हेनरिचने १४ सामन्यात १७२च्या स्ट्राईकरेटने ४८७ धावा कुटल्या होत्या. यंदाच्या हंगामातही हेनरिच झंझावाती फॉर्मात आहे.

वर्ल्डकप जिंकता न आल्याची सल

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने २०२४ टी२० वर्ल्डकप जिंकला. फायनलच्या मुकाबल्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी नमवलं होतं. फायनलमध्ये हेनरिच क्लासनच्या खेळीच्या बळावर एकाक्षणी आफ्रिकेचं पारडं जड होतं. ३० चेंडूत ३० धावा असं समीकरण होतं. दक्षिण आफ्रिकेचा विजय दृष्टीक्षेपात होता. मात्र हार्दिक पंड्याच्या ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह हेनरिचला आवरला नाही. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ५२ धावांची वेगवान खेळी साकारली होती. हेनरिचने अक्षर पटेलच्या चौथ्या षटकात २४ धावा लुटत आफ्रिकेसाठी समीकरण सोपं केलं होतं. हेनरिचच्या बरोबरीने अनुभवी डेव्हिड मिलर क्रीझवर होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा विजय ही औपचारिकता मानली जात होती. मात्र भारतीय संघाने अफलातून पुनरागमन करत जेतेपदावर नाव कोरलं. या पराभवाचा सल दीर्घकाळ मनात राहिला, आजही आहे. त्या पराभवाने मी मानसिकदृष्ट्या थकलो, त्यातून सावरायला वेळ लागला.

दक्षिण आफ्रिकेची वर्ल्डकपची पाटी कोरी

दक्षिण आफ्रिकेचा संघ १९९२ पासून सातत्याने वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होत आहे. मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. सेमी फायनलचा अडथळा पार करता येत नसल्याने त्यांना चोकर्स हा टॅगही मिळाला. २०२७ मध्ये वर्ल्डकप दक्षिण आणि झिम्बाब्वे इथे होणार आहे. घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी दक्षिण आफ्रिकेकडे आहे. टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदानेही आफ्रिकेला दूरच ठेवलं आहे. २००७ मध्ये पहिलावहिला टी२० वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेतच झाला होता. मात्र यजमानांना तो जिंकता आला नाही. तेव्हापासून १० वर्ल्डकप आयोजित करण्यात आले मात्र दक्षिण आफ्रिकेला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. पीटरसनच्या म्हणणं अनुसरत क्रिकेट साऊथ आफ्रिका क्लासनला निवृत्ती मागे घेण्याची विनंती करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. क्लासनने ४ टेस्ट, ६० वनडे आणि ५८ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेतून निवृत्ती घेऊन क्लासनला वर्षभराचाच कालावधी लोटला आहे. या प्रकारातली त्याची कामगिरी उत्तम अशी आहे. ६० वनडेत त्याने ४३.६९च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. क्लासनवर आता विकेटकीपिंग करण्याचीही सक्ती नाही कारण तो निवृत्त झाल्यानंतर रायल रिकलटनने स्वत:ला प्रस्थापित केलं आहे.

तेंबाच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप

तेंबा बावूमच्या प्रेरणादायी नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं. दोन वर्ष चालणाऱ्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने सातत्याने मायदेशात आणि विदेशातही चांगला खेळ केला. फायनलच्या मुकाबल्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला चीतपट करत जेतेपदाची कमाई केली.