इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले. विराटने तर त्याची चक्क गुजराती भाषेत स्तुती केली. मात्र विराटचं गुजराती ऐकून हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलला हसू आवरलं नाही.

Ind vs Eng: पहिल्यांदा नव्हे, दुसऱ्यांदा भारताने दोन दिवसांत जिंकली कसोटी

हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. घरच्या मैदानावर खेळताना कसं वाटतं? नक्की काय भावना असते? या साऱ्या गोष्टींबद्दल अक्षरनेही चांगली उत्तर दिली. मुलाखत संपवण्याची वेळ आली तेव्हा अचानक विराट कोहली मैदानाच्या एका ठिकाणाहून चालत आला आणि गुजराती भाषेत अक्षरला म्हणाला, “ए बापू थारी बॉलिंग कमाल छे!” विराटची बोलण्याची पद्धत आणि लहेजा ऐकून हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल दोघेही हसून हसून लोटपोट झाले.

Ind vs Eng: अरेरे… इंग्लंडच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

तिसऱ्या कसोटीत अक्षर ठरला सामनावीर

अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी केली. या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. एका सामन्यात सर्वात कमी धावा देऊन १० गडी टिपण्याचा विक्रम त्याने केला. तसेच, अक्षर पटेलची ही कामगिरी दिवस-रात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. अश्विनने ७० धावा देत ११ गडी बाद केले.