लांब उडीत भारताच्या मुरली श्रीशंकरने आव्हानांवर मात करत रौप्यपदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पुरुष विभागात तब्बल ४४ वर्षांनी पदकाला गवसणी घातली. श्रीशंकरने रौप्यपदकाला गवसणी घातली असली, तरी श्रीशंकरचा तेथपर्यंतचा मार्ग कठीण होता. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ७.८४ मीटर उडी मारली, तेव्हा श्रीशंकर सहाव्या स्थानावर होता. चौथ्या प्रयत्नात श्रीशंकरला खेळातील नव्या तंत्राचा फटका बसला. श्रीशंकरचा चौथा प्रयत्न अपयशी ठरवण्यात आला. हातात केवळ दोनच प्रयत्न शिल्लक असताना तेव्हा त्याचे वडील आणि प्रशिक्षक एस. मुरली यांनी श्रीशंकरला कानमंत्र दिला. याचा फायदा इतका झाला की श्रीशंकरने ८.०८ मीटर उडी मारताना आपले रौप्यपदक निश्चित केले.

सुवर्णपदक विजेता बहामासचा लॅक्वान नैर्नने ८.०८ मीटर उडी मारली होती. अखेरचा प्रयत्न सुरू झाला, तेव्हा ‘काऊंटबॅक’चा निर्णय घेण्यात आला. यात नैर्न ७.९८ मीटर पर्यंत पोहोचला होता. श्रीशंकरला ७.९९ मीटर उडी मारायची होती. मात्र, या अखेरच्या प्रयत्नांत श्रीशंकर ७.८४ मीटपर्यंतच पोहोचू शकला. त्यामुळे सर्वोत्तम दुसरा प्रयत्न या नियमाच्या आधारावर त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

यापूर्वी १९७८मध्ये एडमाँटन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुरेश बाबूने कांस्यपदक मिळवले होते. लांब उडीतील श्रीशंकर चौथा आंतरराष्ट्रीय पदक विजेता ठरला. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने २००२च्या स्पर्धेत कांस्य आणि एम. पी. प्रजुषाने २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक हे पहिले पाऊल आहे. पॅरिस ऑलिम्पिक मला खुणावत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील या रौप्यपदकाने मला आनंद झाला आहे. मला प्रेरित करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला मी हे पदक अर्पण करतो.

– मुरली श्रीशंकर

पॅरा-पॉवरलिप्टिंग : सुधीरची सुवर्ण कामगिरी

बर्मिगहॅम : भारताच्या सुधीरने राष्ट्रकुल पॅरा-पॉवरलिप्टिंगमध्ये उच्च वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. सुधीरने १३४.५ गुणांची कमाई करताना स्पर्धा विक्रमासह ही कामगिरी केली. आशियाई पॅरा-स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सुधीरने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले. त्यानंतर सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलताना आवश्यक गुण मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. पोलिओग्रस्त असणाऱ्या सुधीरच्या कामगिरीने भारताचे या स्पर्धेतील पॅरा-विभागातील पदकाचे खाते उघडले गेले.

सुधीरने ८८ किलो वजनी गटात २१४ किलो वजन उचलून आशिया-ओशियाना विभागातून जागतिक पॅरा-पॉवरलिप्टिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. सुधीरने २०१३पासून सोनीपत येथे पॉवरलिप्टिंगच्या सरावास सुरुवात केली. त्यानंतर २०१८पासून सुधीरने या खेळातच कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुधीर पॅरा-राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. सुधीर २०२२च्या आशियाई पॅरा-स्पर्धेसाठीही पात्र ठरला होता. ही स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सुधीरपाठोपाठ इकेचुक्वू ख्रिस्तियन ओबीचुक्वूने १३३.६ गुणांसह रौप्य, तर मिकी युल याने १३०.९ गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली.

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी माझी तयारी चांगली झाली होती. आता थोडी विश्रांती घेऊन सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद साजरा करणार आहे. लंडन शहराला भेट देऊन खरेदीदेखील करणार आहे. 

– सुधीर