वृत्तसंस्था, ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अव्वल पाच देशांतील स्थान टिकवून ठेवण्याची गेल्या दोन दशकांपासून परंपरा कायम राखताना यावेळी भारताचा कस लागणार आहे. क्रीडा प्रकारांची संख्या कमी केल्यामुळे भारताला बर्मिंगहॅममधील ६१ पदकांचा आकडा गाठणे कठीण असले, तरी आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवून ऑलिम्पिक खेळांमध्ये आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील राहील. यासाठी बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि ॲथलेटिक्स खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या राष्ट्रकुलने आता खेळांची संख्या कमी करून आयोजन खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे आज, गुरुवारपासून सुरू होणार्‍या या बहु-क्रीडा महाकुंभाचे मर्यादित स्वरूपदेखील स्पर्धेचा खरा आत्मा टिकवून ठेवू शकते, हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर आहे.

‘ओव्हीओ हायड्रो’ येथे होणार्‍या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने गेल्या तीन दशकांतील सर्वांत लहान राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अधिकृत सुरुवात होईल. यामध्ये राष्ट्रकुलमधील ७४ देशांतील सुमारे ३,००० खेळाडू केवळ १० खेळांमध्ये आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांशी स्पर्धा करतील. यात १२६ खेळाडूंचे भारतीय पथकही आपली दावेदारी उपस्थित करेल. सर्वसमावेशक खेळांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आयोजकांनी यातील सहा खेळांमध्ये ‘पॅरा’ स्पर्धांचेदेखील आयोजन केले आहे.

खर्चाला कात्री

वाढत्या खर्चामुळे ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याने ऐनवेळी यजमानपदावरून माघार घेतली होती. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा कठीण परिस्थितीत ग्लासगो शहराने पुढे येत या स्पर्धेला आधार दिला. यापूर्वी २०१४ मधील आवृत्तीचे यशस्वी आयोजन करणार्‍या या स्कॉटिश शहराने पुन्हा एकदा आपले दरवाजे खुले केले आहेत. यावेळी त्यांनी जुन्या स्टेडियम्स आणि पायाभूत सुविधांचा पूर्णपणे वापर करून बर्मिंगहॅम २०२२ च्या तुलनेत तब्बल ६० टक्के कमी खर्चात, म्हणजेच सुमारे १६० दशलक्ष पौंडमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे.

भारतासमोर आव्हान

स्पर्धेचे हे मर्यादित स्वरूप यशस्वी करून दाखवण्याचे मोठे आव्हान ग्लासगो आणि आयोजकांसमोर असताना, भारताला कमी खेळांतही अधिकाधिक पदक जिंकण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मँचेस्टर २००२ स्पर्धेपासून भारताने प्रत्येक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले आहे. जागतिक स्तरावर सर्व खेळांमध्ये पारंपरिक महासत्ता नसतानाही भारताने राष्ट्रकुलमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि नेमबाजी या खेळांचा यंदाच्या स्पर्धेत समावेश नाही. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येला मोठा फटका बसेल.

चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅममध्ये भारताने जिंकलेल्या ६१ पदकांपैकी तब्बल ३१ पदके (बॅडमिंटन ६, क्रिकेट १, हॉकी २, स्क्वॉश २, टेबल टेनिस ७ आणि कुस्ती १२) वगळलेल्या खेळांमधून मिळाली होती. त्यामुळेच यंदाची मोहीम भारतासाठी कठीण मानली जात आहे. ही पोकळी भरून काढण्याची मुख्य जबाबदारी आता ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगवर असेल.

अन्य खेळांतही अपेक्षा; इतर खेळांमध्ये लॉन बॉल्स

संघ बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करेल, अशी भारताला आशा आहे. तेथे महिलांनी सुवर्ण आणि पुरुषांनी रौप्यपदक जिंकून इतिहास रचला होता. ज्युडो खेळाडूंनी गेल्या आवृत्तीत तीन पदके मिळवून दिली होती. यंदा तीव्र स्पर्धेतही ही कामगिरी सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याशिवाय, सहा खेळांमध्ये भारताचे पॅरा-खेळाडूही पदकतालिकेत मोलाचे योगदान देतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

महिला बॉक्सिंगपटू लयीत

बॉक्सिंगमध्ये सर्वांचे लक्ष ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लवलिना बोरगोहेन (७५ किलो) हिच्यावर असेल. तिच्याकडे नसलेले एकमेव मोठे पदक जिंकण्यासाठी ती रिंगमध्ये उतरेल. ५७ किलो वजनी गटातील विश्वविजेती जॅस्मिन लम्बोरिया बर्मिंगहॅममधील कांस्यपदकाचा रंग बदलण्यास उत्सुक असेल. महिलांच्या स्पर्धेत आशियाई विजेती प्रीती पवार (५४ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांच्याकडूनही भारताला आशा आहे. पुरुष विभागात नरेंद्र बेरवाल (९० किलोपेक्षा अधिक), विश्वचषक पदकविजेता सचिन सिवाच (६० किलो) यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

मीराबाईला हॅट्ट्रिकची आस

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी नेहमीच पदकांची लयलूट करणार्‍या वेटलिफ्टिंगची मदार प्रामुख्याने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू हिच्यावर असेल. मणिपूरची ३१ वर्षीय मीराबाई राष्ट्रकुल सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने उतरत असून, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सर्वांत भरवशाची खेळाडू राहिली आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या उत्तेजक चाचण्यांमध्ये काही राष्ट्रीय खेळाडू दोषी आढळल्यामुळे वेटलिफ्टिंगचे पथक अवघ्या ११ सदस्यांवर आले आहे. त्यामुळे सातत्याने यश मिळवून देणार्‍या या खेळातील भारताची पदकाची संधी कमी झाली आहे.

ॲथलेटिक्समध्ये नीरजकडून अपेक्षा

भारताने ॲथलेटिक्ससाठी कमाल मर्यादेनुसार ३२ सदस्यांचे पथक पाठवले असून, ते २२ पदक स्पर्धांमध्ये भाग घेतील. या पथकाचे नेतृत्व दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा करत आहे. यंदा नीरजला सुवर्णपदक मिळवणे सोपे जाणार नाही. श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने गेल्या महिन्यात रोम डायमंड लीगमध्ये ९२.६२ मीटरचा अप्रतिम थ्रो करून विजय मिळवला. त्यामुळे त्याचे तगडे आव्हान नीरजसमोर असेल. ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीमही मैदानात असेल. नीरज व्यतिरिक्त भारताला उंच उडीत सर्वेश कुशारे, लांब उडीत मुरली श्रीशंकर, तिहेरी उडीत प्रवीण चित्रवेल, तसेच पुरुष व महिला दोन्ही ४ बाय ४०० मीटर रिले संघांकडून पदकांच्या अपेक्षा असतील. बर्मिंगहॅममध्ये ॲथलेटिक्स पथकाने आठ पदके जिंकली होती. मात्र, यावेळी तगड्या स्पर्धकांमुळे ती कामगिरी गाठणे आव्हानात्मक असेल.