पदकांची टांकसाळ असं वर्णन होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा अवघ्या काही दिवसात सुरू होत आहे. मात्र यंदा या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या पदकांच्या संख्येत घट होणार आहे. कॉर्पोरेट भाषेत कॉस्ट कटिंग अर्थात खर्चात कपात करण्यात आल्याने यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत १९ऐवजी १० खेळच असणार आहेत. मूळ योजनेनुसार यंदाची कॉमनवेल्थ स्पर्धा ऑस्ट्रेलियातल्या व्हिक्टोरिया इथे होणार होती. मात्र आयोजनाचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने व्हिक्टोरियाने आयोजनातून माघार घेतली.

आयत्यावेळी स्पर्धेसाठी यजमान शहर शोधणं अवघड होतं. स्कॉटलंडमध्ये ग्लासगो शहराने आयोजनासाठी आवेदन सादर केलं. मात्र कॉमनवेल्थ नेहमी ज्या पद्धतीने होतं तेवढे खेळ आम्ही आयोजित करू शकणार नाही असं आयोजकांनी स्पष्ट केलं. कॉमनवेल्थ स्पर्धेत ७४ देशांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच संघटनेचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारीवर्ग सहभागी होतात. एवढी माणसं आणि खूप सारे खेळ हा पसारा सांभाळणं कठीण आहे असं ग्लासगो आयोजकांनी सांगितलं. त्यामुळे ४ ठिकाणी १० खेळ आणि १० दिवसात यंदाची कॉमनवेल्थ स्पर्धा होणार आहे.

ग्लासगो शहरात २०१४ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधाच उपयोगी पडणार आहेत. ग्लासगो शहरात असलेल्या हॉटेलांमध्येच खेळाडू आणि अन्य मंडळींची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी खेलग्राम उभारण्यात आलेलं नाही. कॉमनवेल्थसाठी एवढा खर्च करून त्यातून फायदेशीर असा परतावा नसल्याने आयोजकांनी नव्याने काहीही उभारलेलं नाही.

सर्वसाधारपणे कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी दमदार अशीच असते. चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅम इथे झालेल्या स्पर्धेत भारताने ६१ पदकांची कमाई केली होती. यापैकी निम्म्याहून अधिक पदकं यंदा जे खेळ वगळण्यात आलेत त्या खेळांमध्ये मिळाली होती. आता ते खेळच वगळण्यात आल्याने भारताची पदकांची झोळी मर्यादितच राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो या खेळांमध्ये भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे. भारतीय पथकाचे प्रमुख रोहित राजपाल आहेत. पुढची कॉमनवेल्थ स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे. त्यादृष्टीने ही स्पर्धा भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी वर्ग यांच्यासाठी महत्त्वाची आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, ऑलिम्पिक रौप्यपदकप्राप्त मीराबाई चानू, ऑलिम्पिक पदकविजेती लोव्हलिना बॉरगाघाई, लॉन्गजंपर मुरली श्रीशंकर, जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि जिम्नॅस्ट प्रणिती नायक यांच्याकडून भारताला पदकाच्या आशा आहेत.

कुठले खेळ वगळण्यात आले आहेत?

यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, नेमबाजी आणि तिरंदाजी हे प्रमुख खेळ वगळण्यात आले आहेत. यामुळे पीव्ही सिंधू, मनू भाकेर, हरमनप्रीत सिंग किंवा अमन सेहरावत यांच्यापैकी कुणीही खेळताना दिसणार नाही. यांच्याबरोबरीने रग्बी सेव्हन्स, बीच व्हॉलीबॉल,डायव्हिंग, माऊंटन बायकिंग, ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि ट्रायलथॉन या खेळांनाही नारळ देण्यात आला आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी १००हून अधिक पदकं पटकावली आहेत. ग्लासगो शहरात ज्या परिसरात कॉमनवेल्थ स्पर्धा होणार आहे तिथे नेमबाजीसाठी आवश्यक शूटिंग रेज उपलब्ध नाही. फक्त स्पर्धेसाठी म्हणून नव्याने शूटिंग रेंज उभारणं तसंच थोड्या अंतरावर असलेली शूटिंग रेंज अद्ययावत करणं यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यामुळे स्पर्धेसाठीच्या एकूण खर्चात वाढ झाली असती. खर्चाचा मुद्दा लक्षात घेऊन नेमबाजी हा खेळ वगळण्यात आला.

नेमबाजीप्रमाणेच कुस्तीमध्ये भारतीय खेळाडू हमखास पदकं पटकावतात. भरघोस पदकं मिळवून देणारा खेळ असं कुस्तीचं वर्णन केलं जातं. मात्र त्यासाठी आवश्यक वास्तू आणि लॉजिस्टिक्स यामुळे आयोजकांनी कुस्तीचंही नाव यादीतून वगळलं. कुस्तीसाठी खास स्वतंत्र असा सेटअप तयार करावा लागतो. याऐवजी आयोजकांनी एकाच परिसरात होऊ शकतील अशा खेळांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. भारतीय कुस्तीपटूंचं यामुळे नुकसान झालं. बॅडमिंटनसाठी आवश्यक स्टेडियम परिसरात नसल्याचा फटका बसला आहे. १९९८ पासून हॉकी कॉमनवेल्थ स्पर्धेचा भाग आहे मात्र यंदा हॉकीचे सामनेही दिसणार नाहीत. चार वर्षांपूर्वी क्रिकेट कॉमनवेल्थ स्पर्धेचा भाग होतं मात्र यंदा क्रिकेटला डच्चू देण्यात आला आहे.