Commonwealth Games 2026 live updates India Boxing: प्रीती पवार आणि जास्मिन लम्बोरिया यांनी ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये शनिवारी भारताच्या पदकांची सुरुवात दुहेरी सुवर्णपदकांनी केली. दुसरीकडे, जादूमणी सिंग याला पुरुषांच्या ५५ किलो गटाच्या अंतिम सामन्यात जाय डिक्सनकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्याने रौप्यपदकावर समाधान मानलं. प्रीतीने महिला ५४ किलो गटात कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडो हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव केला, तर जयस्मिनने महिला ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत गतविजेत्या उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्श हिला त्याच फरकाने नमवत सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे, मागील कॉमनवेल्थ स्पर्धेत जयस्मिनने कांस्यपदक जिंकलं होतं.
बॉक्सिंगमध्ये भारताच्या पदकांची ही केवळ सुरुवात असून, शनिवारी आणखी सात भारतीय बॉक्सर विविध वजनी गटांच्या अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी रिंगमध्ये उतरणार आहेत. या ताफ्याचं नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोर्गोहेन करणार आहे. ड्रॉमुळे तिला अंतिम फेरीपूर्वी केवळ एकच सामना खेळावा लागला. भारताने ग्लासगो स्पर्धेसाठी १४ बॉक्सर पाठवले होते. त्यापैकी १० जण उपांत्य फेरीत पोहोचले आणि विशेष म्हणजे हे सर्व १० बॉक्सर अंतिम फेरीतही खेळताना दिसत आहेत.
CWG 2026: बॉक्सिंग सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
७. भारत-नरेंद्र बरेवाल विरूद्ध इंग्लंड-डमार थोमस
बॉक्सिंगमधील अंतिम फेरीतील भारताचा अखेरचा सामना खेळवला जात आहे. यामध्ये नरेंद्र बरेवाल आणि इंग्लंडचा डमार थोम यांच्यात ९० किलो वजनी गटात भिडंत होत आहे. पहिल्या फेरीत नरेंद्र बरेवाल पिछाडीवर आहे. सुरूवातीच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर राहिल्यानंतर भारताला अखेरच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.
६. भारत-अंकुश पंघाल विरूद्ध इंग्लंड डिमेजी शिट्टू
भारताचा बॉक्सर अंकुश पंघालने इंग्लंडच्या बॉक्सरचा ४-१च्या फरकाने पराभव करत बॉक्सिंगमधील सातवं सुवर्णपदक पटकावलं आहे. पहिल्या फेरीत मागे राहिल्यानंतर अंकुशने पुढील दोन्ही फेरीत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
भारताकडून अंकुश पंघाल ७५ किलो वजनी गटात इंग्लंडच्या बॉक्सरविरूद्ध खेळण्यासाठी उतरला आहे. पहिली फेरी इंग्लंडच्या बाजूने गेल्यानंतर अंकुश पंघालने दुसऱ्या फेरीत कमबॅक केलं. तर दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या खेळाडूचा एक गुणही कापण्यात आला.
५. भारत-सचिन सिवाच विरूद्ध नामिबिया-डेव्हेलो
भारताचा बॉक्सर सचिन सिवाच ६० किलो वजनी गटात अंतिम लढतीसाठी उतरला आहे. त्याच्याविरूद्ध नामिबियाचा बॉक्सर ब्लू रिंगमध्ये खेळत आहे. पहिल्या फेरीतील पंचांचा निर्णय ३-२च्या फरकाने डेव्हेलोच्या दिशेने लागला. सातत्याने हेड अपची सूचना रिंगमधील पंचांनी दिल्यानंतरही सचिन सातत्याने खेळताना डोकं खाली करत असल्याने दुसऱ्या फेरीत त्याचे गुण कापले. त्यामुळे दुसरी फेरीदेखील नामिबियाच्या दिशेने लागली.
४. भारत-लव्हलिना बॉर्गाेहेन विरूद्ध ऑस्ट्रेलिया-एमा ग्रीनट्री
लव्हलिना बोर्गाेहेनला अखेरच्या फेरीत ४-१च्या निर्णयाने पराभव पत्करावा लागला. लव्हलिनाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनट्रीने सुवर्णपदक पटकावलं.
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बॉर्गोहेन आता रिंगमधून उतरली आहे. लव्हलिनासमोर ऑस्ट्रेलियाची बॉक्सर आहे. पहिली फेरी ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या खात्यात गेली आहे. तर दुसऱ्या फेरीअखेरीस दोन्ही खेळाडूंचे गुण सारखे आहेत.
३. भारत-अरूंधती चौधरी विरूद्ध इंग्लंड-शँटेल रीड
अरूंधती चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी
भारताची बॉक्सर अरूंधती चौधरी हिने शँटल रीडविरूद्धच्या अंतिम सामन्यात तिन्ही फेऱ्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवत दणदणीत विजयाची नोंद केली. यासह बॉक्सिंगमध्ये भारताने पाचवं सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे.
अरूंधती चौधरी आघाडीवर
महिला ७० किलो गटाच्या अंतिम सामन्याची सुरुवात अत्यंत सावध पद्धतीने झाली. दोन्ही बॉक्सर सुरुवातीला प्रतिस्पर्धीनेच पहिला हल्ला करावा, याची वाट पाहताना दिसल्या. इंग्लंडची रीड रिंगच्या मध्यभागी उभी राहून खेळत होती, तर अरुंधती चौधरी दोरांच्या जवळ राहून संधीची वाट पाहत होती. पण यानंतर वर्ल्ड नंबर-२ असलेली अरूंधती चौधरी दोन्ही फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहे.
सामन्याला सुरूवात
भारताची पुढची बॉक्सर अरूंधती चौधरी रेड रिंगमध्ये उतरली आहे. तर इंग्लंडची शँटेल रीड ब्लू रिंगमधून उतरली आहे.
२. भारत-प्रिया घंघास विरूद्ध कॅनडा-मारी-बथूल अल-अहमदियेह
प्रिया घंघासची सुवर्णपदकाची कमाई
६० किलो वजनी गटात ४-१च्या निर्णयाने प्रिया घंघासने सुवर्णपदक आपल्या नावे केलं आहे. यासह बॉक्सिंगमध्ये भारताने चौथं सुवर्णपदक पटकावलं आहे.
पहिली फेरी कॅनडाच्या तर दुसऱ्या फेरीत प्रिया घंघासची आघाडी
प्रिया आणि मारी बथूल यांच्यातील पहिल्या फेरीत पंचांचे निर्णय कॅनडाच्या बाजूने लागले. तर दुसऱ्या फेरीत प्रियाने चांगली कामगिरी करत आघाडी मिळवली.
बॉक्सिंगच्या अंतिम लढती आता एकामागून एक रंगत आहेत. साक्षी चौधरीच्या सुवर्णविजयानंतर आता तिची चुलत बहीण प्रिया घंघास रिंगमध्ये उतरली आहे. महिला ६९ किलो गटाच्या अंतिम सामन्यात तिच्यासमोर कॅनडाच्या मारी-बथूल अल-अहमदियेह हिचं आव्हान आहे. भारताच्या सुवर्णपदकांच्या मालिकेत आणखी एक भर घालण्याची संधी प्रियासमोर आहे.
उन्नती शर्माची कांस्यपदकावर मोहोर!
कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये भारताच्या उन्नती शर्मा हिने महिला ६३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. कांस्यपदकाच्या लढतीत उन्नतीने दक्षिण आफ्रिकेच्या स्काय नोस्टर हिचा इप्पोन (१००-०) ने एकतर्फी पराभव करत शानदार विजय मिळवला. या प्रभावी कामगिरीसह उन्नतीने भारताच्या पदकसंख्येत आणखी एका पदकाची भर घालत स्पर्धेतील आपली दमदार मोहीम संस्मरणीय केली.
१. साक्षी चौधरी विरूद्ध रूबी व्हाईट
साक्षी चौधरीची सुवर्णपदकाला गवसणी
साक्षी चौधरीने रूबी व्हाईटचा पराभव करत भारताला बॉक्सिंगमध्ये तिसरं सुवर्णपदक पटकावून दिलं आहे. साक्षी चौधरी हिने महिला ५१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाइट हिचा ५-० अशा एकमताच्या निर्णयाने पराभव करत ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६मध्ये सुवर्णपदक पटकावलं. याआधी प्रीती पवार आणि जास्मिन लम्बोरिया यांनी अनुक्रमे महिला ५४ किलो आणि ५७ किलो गटात सुवर्णपदक जिंकत भारताची मान उंचावली होती. साक्षीच्या विजयामुळे बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्णपदकांची मालिका आणखी भक्कम झाली.
साक्षी सुवर्णपदकाच्या दिशेने
दोन फेऱ्यांनंतर फक्त एका पंचाने सामना बरोबरीत असल्याचं मत नोंदवलं आहे, तर उर्वरित सर्व पंचांच्या गुणपत्रिकेत साक्षी चौधरी आघाडीवर आहे. त्यामुळे सुवर्णपदकाच्या दिशेने साक्षीने मजबूत पाऊल टाकलं आहे.
साक्षीची दणदणीत सुरूवात
पहिल्या फेरीनंतर विश्रांतीदरम्यान प्रशिक्षकाने साक्षीला स्पष्ट सूचना दिल्या, “तू तिच्यावर स्पष्टपणे वर्चस्व गाजवत आहेस. पुढची तीन मिनिटंही अशीच खेळ, विजय तुझाच होईल!” सामन्याच्या सुरुवातीला साक्षीने संयम राखत खेळ केला. त्यानंतर दोन्ही बॉक्सर आक्रमक झाल्या. मात्र, साक्षीचे पंच अधिक अचूक आणि प्रभावी ठरले. परिणामी, पंचांनी एकमताने (५-०) पहिली फेरी साक्षीच्या बाजूने दिली.
सामन्याला सुरूवात
आता सर्वांचं लक्ष भारताच्या आणखी एका सुवर्णपदकाच्या लढतीकडे लागलं आहे. महिला ५१ किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताची साक्षी चौधरी हिच्यासमोर रुबी व्हाइट हिचं आव्हान असणार आहे. साक्षी चौधरी ही उंचीने प्रतिस्पर्धीपेक्षा सरस असून ती लाल रंगाच्या कॉर्नरमधून, तर रुबी व्हाइट निळ्या कॉर्नरमधून रिंगमध्ये उतरली आहे. अखेर बहुप्रतीक्षित अंतिम लढतीला सुरुवात झाली आहे.
