Rishikanta Singh Wo Silver Medal In Weight Lifting: कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेतील चौथ्या दिवशी भारताने दमदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या ३ दिवसातं भारताला केवळ १ पदक जिंकता आलं होतं. झंडू कुमारने पॅरा वेटलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली होती. दरम्यान चौथ्या दिवशी पदकांच्या संख्येत भर पडली आहे. भारताचा स्टार वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो वजनीगटात दमदार कामगिरी करुन रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत मोठा रेकॉर्ड नोंदवला आहे.

भारताच्या २८ वर्षीय ऋषिकांत सिंगने अंतिम फेरीतील सुरुवातीपासून पकड मजबूत केली. ऋषिकांतने स्नॅच फेरीतील पहिल्याच प्रयत्नात ११६ किलो, तर दुसऱ्या प्रयत्नात ११९ किलोव वजन यशस्वीरित्या उचललं. तर तिसऱ्या प्रयत्नात त्याने तब्बल १२१ किलो वजन उचलून सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. यासह त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेतील स्नॅच प्रकारातील रेकॉर्ड जूना रेकॉर्ड मोडून, नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

ऋषिकांत सिंगने २६४ किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं. यादरम्यान तिसऱ्या स्नॅचमध्ये १२१ किलो वजन उचलताच त्याने कॉमनवेल्थ स्पर्धेतील रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी १२० किलो वजन उचलण्याचा रेकॉर्ड होता. पण आता हा रेकॉर्ड ऋषिकांत सिंगच्या नावावर आहे. तर मलेशियाच्या मोहम्मद अनिक कासदानने २७३ किलो वजन उचलून सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. तर केनियाच्या जोशुआ अमुंगा मबोयाने २६० किलो उचलून कांस्यपदकाची कमाई केली आहे.

भारताचं कॉमनवेल्थ २०२६ स्पर्धेतील दुसरं पदक

ऋषिकांत सिंगने मिळवलेल्या या पदकानंतर भारताची पदकांची एकूण संख्या २ वर जाऊन पोहोचली आहे. याआधी स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी पॅरा पॉवरलिफ्टिंग क्रीड प्रकारात झंडू कुमारने कांस्यपदकाची कमाई केली होती. हे भारताचं या स्पर्धेतील पहिलं पदक होतं. आता ऋषिकांत सिंगने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण भारतातून आणि क्रीडा विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.