वृत्तसंस्था, ग्लासगो
बॉक्सिंगपटूंच्या अभूतपूर्व यशाच्या जोरावर भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या समारोपापूर्वीच्या दिवशी सात सुवर्णपदकांची लयलूट केली. भारताच्या १० बॉक्सिंगपटूंनी अंतिम फेरी गाठली होती, ज्यापैकी केवळ लवलिना बोरगोहेन, जादुमणी सिंह आणि नरेंदर बेरवाल यांनाच रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. बॉक्सिंगमधील या घवघवीत यशामुळे भारताने पदकतालिकेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि आठ कांस्यपदकांसह एकूण ३८ पदके मिळवून चौथे स्थान मिळवले.
शनिवारी भारताकडून प्रीती पवार (५४ किलो), जॅस्मिन लम्बोरिया (५७ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो), प्रिया घंघास (६० किलो), अरुंधती चौधरी (७० किलो), सचिन सिवाच (६० किलो), अंकुश पंघाल (८० किलो) यांनी सुवर्ण, तर जादुमणी सिंह (५५ किलो), लवलिना (७५ किलो) नरेंदर बेरवाल (९० किलोपेक्षा अधिक) यांनी रौप्यपदक मिळवले.
साक्षीने इंग्लंडच्या रूबी व्हाइटविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. स्थानिक प्रेक्षकांचा रूबीला मोठा पाठिंबा असतानाही साक्षीने तिचे नियंत्रण सुटू दिले नाही. अत्यंत अचूक आणि वेगवान ठोसे मारून साक्षीने रुबीला बचावाची संधीच दिली नाही. लांब अंतरावरून मारलेले तिचे सरळ जॅब्स आणि काउंटर-पंचेस यामुळे तिने प्रतिस्पर्धीला स्वत:च्या जवळ येऊ दिले नाही, ज्यामुळे तिला स्वत:चा बचाव करणे सोपे झाले.
दुसरीकडे, प्रिया घंघाससाठी सामन्याची सुरुवात आव्हानात्मक राहिली. पहिल्या फेरीत कॅनेडियन बॉक्सिंगपटू मारिए-बाथौल अल-अहमदिएह हिने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. प्रियाचा बचाव सुरुवातीला थोडा कमजोर पडल्याने तिला पहिली फेरी गमवावी लागली. पहिल्या फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही प्रियाने संयम गमावला नाही. तिने दुसर्या आणि तिसर्या फेरीत आपल्या खेळात कमालीचा बदल केला आणि सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. दुसर्या फेरीत मात्र प्रियाने आपल्या खेळात रणनीतीत बदल केला. प्रियाने आपल्या शारीरिक रचनेचा आणि उंचीचा चांगला वापर केला. प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा जवळ येऊन प्रहार करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा प्रियाने लांब अंतरावरून ठोसे मारत तिला दूर ठेवले आणि स्वत:चा बचाव मजबूत केला.
अरुंधतीविरुद्ध इंग्लंडची बॉक्सिंगपटू चँटेल रीड चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासह रिंगमध्ये उतरली होती. प्रेक्षकांच्या आवाजाचा दबाव न घेता अरुंधतीने कमालीचा संयम दाखवला. तिने चँटेलच्या सुरुवातीच्या आक्रमक चढायांना अत्यंत शांतपणे हाताळले. सामन्याच्या पूर्वार्धात चँटेल रीडने काही जोरदार ठोसे मारून लय पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अरुंधतीने रिंगचा सुरेख अंदाज घेत अप्रतिम पदलालित्याच्या जोरावर स्वत:चा बचाव केला.
ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनट्रीच्या वेगवान पवित्र्याचा लवलिनाला सामना करता आला नाही. दुसर्या फेरीत लवलिनाने जरुर पुनरागमन केले. मात्र, निर्णायक तिसर्या फेरीत ग्रीनट्रीने अखेरच्या काही मिनिटात आक्रमक ठोसे मारत वर्चस्व राखले. त्यामुळे लवलिनाला पराभव पत्करावा लागला. सचिन सिवाचने अंतिम सामन्यात सुवर्णपदक नामिबियाच्या ट्रायगेन न्डेवेलो याचे कडवे आव्हान अगदी अखेरच्या क्षणी राखलेल्या भक्कम बचावाच्या जोरावर ३-२ असे परतवून लावले. नामिबियाचा बॉक्सर न्डेवेलो अत्यंत आक्रमक आणि जवळ येऊन ठोसे मारण्यात पटाईत होता. परंतु, सचिनने आपल्या उत्कृष्ट पदलालित्याच्या जोरावर त्याला जवळ येऊ दिले नाही. लांब अंतरावरून मारलेले त्याचे सरळ जॅब्स आणि हुक्स थेट प्रतिस्पध्र्याच्या चेहर्यावर बसत होते आणि तेच निर्णायक ठरले.
प्रीतीने महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्कार्लेट डेल्गाडोचा ५-० असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर जॅस्मिनने महिलांच्या ५७ किलो गटात उत्तर आयर्लंडच्या गतविजेत्या मिकाएला वॉल्शवर ५-० असा निर्विवाद विजय मिळवत सोनेरी यश मिळवले. जादुमणी सिंहला मात्र ऑस्ट्रेलियाच्या जे डिक्सनकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. अंकुश पंघालने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूला नमवले. बॉक्सिंगच्या अखेरच्या लढतीत नरेंदर बेरवालला इंग्लंडच्या दमार थॉमस याच्याकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. भारताने १४ पैकी १० वजनी गटांत पदक जिंकण्याची कामगिरी केली.
