पीटीआय, बर्मिगहॅम : भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली. ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो)  यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

बजरंग पुनियाने ६५  किलोच्या अंतिम लढतीत आक्रमक खेळ केला. त्याचवेळी कॅनडाचा प्रतिस्पर्धी लाच्लान मॅकनिलकडून सातत्याने पायावर होणारे आक्रमण बजरंगने चपळता दाखवून प्रत्येक वेळेस परतवून लावले. निर्णायक विजय मिळवून अंतिम फेरीत आलेल्या बजरंगने सुवर्ण लढतीत अखेरीस ९-२  असा विजय मिळवला.

बजरंगपाठोपाठ साक्षी मलिकने भारताला कुस्तीमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. साक्षीला सुवर्णपदकाच्या लढतीत मात्र कॅनडाच्या अ‍ॅना गोन्झालेसविरुद्ध पहिल्या फेरीत ०-४  असे पिछाडीवर राहावे लागले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत सुरुवातीलाच दुहेरी पट काढून साक्षीने दोन गुणांची कमाई केली आणि नंतर धोकादायक स्थितीत आलेल्या क्षणाचा फायदा उठवून गोन्झालेसला चितपट करून सुवर्णपदक मिळवले.

महिला विभागातील ५७  किलो लढतीत अंशू मलिकला नायजेरियाच्या ओडुनायो अ‍ॅडेकुओरोयेचे आव्हान पेलवले नाही. अंशूला सुवर्णपदकाच्या लढतीत ओडुनायोकडून ३-७ असा पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटात भारताच्या दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामविरुद्ध ३-० अशी बाजी मारली.

बॅडमिंटन

सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

पीव्ही सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी बॅडमिंटनमधील एकेरीतून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने युगांडाच्या हुसिना कोबुगाबेचा २१-१०, २१-९, तर श्रीकांतने श्रीलंकेच्या डुमिंडू अ‍ॅबीविक्रमाचा २१-९, २१-१२ असा पराभव केला. महिला दुहेरीतही ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मॉरिशसच्या लेऊंग जेमिमा आणि मुंगरा गणेशावर २१-२, २१-४ अशी मात केली.

टेबल टेनिस

मनिका, श्रीजा, शरथ यांची आगेकूच

मनिका बात्रा आणि श्रीजा अकुला यांनी शुक्रवारी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मनिकाने ऑस्ट्रेलियाच्या जी मिनह्युंगवर ११-४, ११-८, ११-६, १२-१० असा विजय मिळवला. श्रीजाने वेल्सच्या चार्लोट केरीला ८-११, ११-७, १२-१४, ९-११, ११-४, १५-१३, १२-१० असे नामोहरम केले. श्रीजाने अचंता शरथ कमलच्या साथीने मिश्र दुहेरीत मलेशियाच्या लेआँड ची फँग आणि हु यिंग जोडीचा ५-११, ११-२, ११-६, ११-५ असा पराभव केला. पुरुष एकेरीत कमलने फिन लू याचा १२-१०, ११-८, ११-७, ११-६ असा फडशा पाडला.

लॉन बॉल्स

महिला दुहेरीत विजय

लव्हली चौबे आणि नयनमोनी सैकेई जोडीने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या लॉन बॉल्स क्रीडा प्रकाराची उपांत्यपूर्व फेरी गाठली. लव्हली-नयनमोनी जोडीने इंग्लंडच्या सोफी टॉलकार्ड आणि एमी फॅरोह जोडीवर १८-१४ असा विजय मिळवला.

अ‍ॅथलेटिक्स

पुरुष संघ रिलेच्या अंतिम फेरीत

भारतीय पुरुष संघाने ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मुहम्मद अनास याहिया, नोहा निर्मल टॉम, मोहम्मद अजमल आणि अमोज जेकब यांचा भारतीय संघात समावेश होता. दुसऱ्या पात्रता शर्यतीत भारतीय संघाने ३ मिनिटे, ०६.९७ सेकंद अशी वेळ दिली. भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. केनियाने ही शर्यत जिंकली. अंतिम शर्यत रविवारी होईल. दरम्यान, १०० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविणारी ज्योती याराजी पात्रता फेरीतच गारद झाली. ज्योती पात्रता शर्यतीत (१३.१८ सेकंद) चौथी आली. लांब उडीत अ‍ॅन्सी सोजनही अपयशी ठरली.

हॉकी

उपांत्य फेरीत भारतापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

राष्ट्रकुल हॉकीमध्ये शनिवारी भारतीय पुरुष संघापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. आफ्रिकेने साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात गतविजेत्या न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले, तरी त्यांना आगेकूच करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. 

  • वेळ : रात्री १०.३० वा.   ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३

क्रिकेट

उपांत्य फेरीत भारत-इंग्लंड आमनेसामने

भारतीय महिला संघाचा शनिवारी राष्ट्रकुलमधील ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडशी सामना होईल. भारतीय संघाला साखळी फेरीच्या सलामीच्या लढतीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी पाकिस्तान आणि बार्बाडोस यांच्यावर सरशी साधत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आता इंग्लंडला नमवत राष्ट्रकुलच्या क्रिकेटमधील पहिले पदक जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

  • वेळ : दुपारी ३.३० वा.   ’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, सोनी सिक्स