चेन्नई : भारतीय संघातील खेळाडूंना सातत्याने होणाऱ्या दुखापतींची चिंता असली, तरी खेळाडू विश्रांती मिळावी यासाठी ‘आयपीएल’च्या सामन्यांना मुकण्याची शक्यता कमीच आहे, असे वक्तव्य कर्णधार रोहित शर्माने केले.
भारताला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेत भारताला जसप्रीत बुमरा आणि श्रेयस अय्यर यांसारख्या प्रमुख खेळाडूंची उणीव जाणवली. या दोघांसह प्रसिध कृष्णा आणि दीपक चहर यांना अलीकडच्या काळात पाठीच्या दुखापतीने सतावले आहे. यंदा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने त्यापूर्वी खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. परंतु भारतीय खेळाडू आता ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये खेळणार आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना विश्रांती द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय पूर्णपणे त्या त्या संघांचा, संघ मालकांचा आणि खेळाडूंचा असल्याचे रोहितने स्पष्ट केले. ‘‘खेळाडूंना सातत्याने होणाऱ्या दुखापतींची आम्हाला नक्कीच चिंता आहे. आम्हाला प्रमुख खेळाडूंची उणीव जाणवली. या खेळाडूंचे अंतिम ११ जणांमधील स्थान निश्चित होते. तुम्ही जेव्हा सातत्याने क्रिकेट खेळता, तेव्हा दुखापती होण्याची शक्यता वाढते. परंतु दुखापतींवर कोणाचेही नियंत्रण नाही,’’ असे चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर रोहित म्हणाला.