उरुग्वेच्या दिएगो फोर्लानची हुकलेली पेनल्टी.. पहिल्या सत्रात ब्राझीलने घेतलेली आघाडी.. त्यानंतर लगेचच उरुग्वेने साधलेली बरोबरी.. निर्णायक आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी केलेले प्रतिहल्ले.. सामना रंगतदार स्थितीत असताना उंचपुऱ्या पॉलिन्होने हेडरद्वारे केलेला विजयी गोल.. यामुळे ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत रूबाबात धडक मारली आहे. आता ब्राझीलला कॉन्फेडरेशन चषक उंचावण्यासाठी रविवारी विश्वविजेत्या स्पेन आणि इटली यांच्यातील विजेत्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच ब्राझीलच्या डेव्हिड लुइझने आपल्याच गोलक्षेत्रात दिएगो लुगानोला पाडल्यानंतर उरुग्वेला पेनल्टी-किक बहाल करण्यात आली. पण दिएगो फोर्लानला त्याचा फायदा उठवता आला नाही. फोर्लानने मारलेला फटका ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारने डाव्या बाजूला झेप घेऊन अडवला. स्टेडियममधील वातावरण तापल्यानंतर ब्राझीलने जोरदार चाली रचल्या. अखेर पहिल्या सत्राची दोन मिनिटे शिल्लक असताना फ्रेड याने ब्राझीलचे खाते खोलले. पॉलिन्होकडून मिळालेल्या पासवर नेयमारने चेंडूवर नियंत्रण मिळवले. उरुग्वेचा गोलरक्षक फर्नाडो मुस्लेरा याने नेयमारचा फटका अडवण्याचा प्रयत्न केला. पण समोरच उभ्या असलेल्या फ्रेडने चेंडू सहजपणे गोलजाळ्यात ढकलला.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच उरुग्वेने चोख प्रत्युत्तर दिले. ब्राझीलच्या बचावपटूंकडून लुइस सुआरेझने चेंडू हिरावून घेतल्यानंतर त्याने तो एडिन्सन कावानीकडे सोपवला. कावानीने कोणतीही चूक न करता उरुग्वेला बरोबरी साधून दिली. सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच नेयमारच्या क्रॉसवर पॉलिन्होने हवेत उंच उडी घेऊन हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि स्टेडियममध्ये ब्राझीलच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. निर्णायक गोल झळकावल्यानंतर पॉलिन्होने स्टेडियमबाहेर जाऊन सहकाऱ्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला. आता घरच्या चाहत्यांना कॉन्फेडरेशन चषक विजयाची भेट देण्यासाठी ब्राझील उत्सुक आहे.
ब्राझीलचे निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष
बेलो होरिझोन्टे (ब्राझील) : कॉन्फेडरेशन चषकाचा सामना सुरू असताना स्टेडियमबाहेर हजारो नागरिकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी निदर्शकांना थोपवण्यासाठी पोलीस दलाचे आगमन झाले आणि या दोन्ही गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. आगामी फुटबॉल विश्वचषकाच्या खर्चासाठी भाडे वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, त्याच्या निषेध म्हणून कॉन्फेडरेशन चषकाचा ब्राझील आणि उरुग्वे यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. या वेळी पोलिसांनी स्टेडियमच्या बाहेर दोन किमीच्या परिसरापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी स्टेडिमच्या जवळ निदर्शक घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या संघर्षांमध्ये दोन निदर्शक जखमी झाले आहेत.