विश्वविजेत्या स्पेन संघाचा विजयवारू भरधाव वेगाने जेतेपदाच्या दिशेने निघाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठेची जेतेपदे नावावर असणाऱ्या स्पेनला कॉन्फेडरेशन चषकाच्या जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदा जेतेपद पटकावण्याची त्यांना चांगली संधी आहे. प्राथमिक फेरीचा अडथळा सहजपणे पार केल्यानंतर उपान्त्य फेरीत त्यांच्यासमोर आव्हान आहे ते इटलीचे. कामगिरीत चढउतार असणाऱ्या इटलीसमोर सातत्यपूर्ण स्पेनचा अडथळा आहे.
प्राथमिक फेरीच्या पहिल्याच सामन्यात इटलीने मेक्सिकोवर सहज मात केली. दुसऱ्या लढतीत जपानविरुद्ध दोन गोलनी पिछाडीवर पडलेल्या इटलीने जोरदार पुनरागमन करत थरारक लढतीत ४-३ असा निसटता विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात मात्र यजमान ब्राझीलच्या झंझावातासमोर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ब्राझीलच्या आक्रमणासमोर इटलीचा संघ निरुत्तर ठरला आणि त्यांचा २-४ असा पराभव झाला. प्राथमिक फेरीत झालेल्या चुका टाळत बलाढय़ स्पेनचा त्यांना सामना करायचा आहे. २००९ मध्ये याच स्पर्धेत उपांत्य फेरीत इटलीने स्पेनला चीतपट केले होते. या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी इटली उत्सुक आहे.
विन्सेट डेल बॉस्क्यू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या स्पेनला दुखापतींनी ग्रासले आहे. फर्नाडो टोरेसच्या जागी रॉबटरे सोलडाडोची मुख्य आघाडीपटू म्हणून संधी मिळाली. ताहितीविरुद्धच्या सामन्यात ४ गोल झळकावत सोलडाडोने या संधीचे सोने केले. मात्र दुखापतीमुळे इटलीविरुद्धच्या लढतीत तो खेळण्याची शक्यता कमी आहे. सेक फॅब्रेगासही स्नायूच्या दुखापतींनी त्रस्त असल्याने बॉस्क्यू यांच्या चिंता वाढल्या आहेत. दुसरीकडे गोल झळकावण्यात महत्त्वाची भूमिका असलेला मारिओ बालोटेली दुखापतग्रस्त झाल्याने इटलीला डावपेचात बदल करावे लागणार आहेत. आंद्रेआ पिलरे, इम्युनुअस गिआचेरिनी यांच्यावर इटलीची भिस्त आहे. जॉर्डी अल्बा, प्रेडो यांच्यासह आंद्रे इनेस्टा हे स्पेनसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.