प्रत्येक खंडातील संघाचा समावेश असलेल्या आणि २०१४च्या फिफा विश्वचषकाची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पध्रेला शनिवारपासून ब्राझीलमध्ये सुरुवात होणार आहे. यजमान ब्राझील आणि जपान हे दोन्ही संघ उद्घाटनाच्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. ब्राझील, स्पेन, जपान, मेक्सिको, उरुग्वे, ताहिती, इटली आणि नायजेरिया या आठ संघांमध्ये कॉन्फेडरेशन चषकासाठी चुरस रंगणार आहे.
ब्राझीलने २००९मध्ये झालेल्या कॉन्फेडरेशन चषकाला गवसणी घातली असली तरी दुबळ्या बचावामुळे त्यांच्यावर सध्या टीकेचा भडिमार होत आहे. लुइस फिलिप स्कोलारी यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ब्राझीलला सहा सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला आहे. अलीकडेच ब्राझील संघाने फ्रान्सवर ३-० असा विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. नेयमारच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीचा अपवाद वगळता ब्राझीलने संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे इराकवर मात करून जपानचा संघ विजयपथावर परतलेला आहे. जपानच्या संघात केईसुके होन्डा आणि युगो नागाटोमो या बलाढय़ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन.
सामन्याची वेळ : रात्री १२.३० वा.पासून