पीटीआय, नवी दिल्ली : भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या करोना चाचणीचा अहवाल बुधवारी दुसऱ्यांदा सकारात्मक आल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला तो मुकल्यास भारताच्या चिंतेत भर पडू शकेल.

‘‘रोहितच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पुन्हा सकारात्मक आला आहे. त्यामुळे १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोहित सध्या विलगीकरणात असून, उपकर्णधार केएल राहुलसुद्धा या सामन्यात खेळणार नसल्याने जसप्रीत बुमराकडे कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सांगितले.

या सामन्यात रोहित खेळू न शकल्यास जसप्रीत बुमराकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. ३५ वर्षांत प्रथमच भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाजाकडे दिले जाऊ शकते. याआधी वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी १९८७पर्यंत भारताचे कर्णधारपद सांभाळले होते.

शार्दूल की अश्विन?

बुमराच्या साथीने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. परंतु शार्दूल ठाकूर हा चौथा वेगवान गोलंदाज खेळवायचा की फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी द्यावी, हा पेच भारतापुढे आहे. रोहितने माघार घेतल्यास युवा शुभमन गिलच्या साथीने चेतेश्वर पुजारा किंवा हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला सलामीला उतरावे लागणार आहे. राखीव सलामीवीर म्हणून मयांक अगरवाल इंग्लंडमध्ये पोहोचला असला तरी अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान देणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत रोहित खेळणार नाही, हे अद्याप पक्के झाले नाही. तो आमच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी होणाऱ्या करोना चाचण्यांचे अहवाल नकारात्मक आल्यास रोहित सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकते.

– राहुल द्रविड, भारताचा मुख्य प्रशिक्षक