श्रीराम वीरा

३१ मार्च २०२६ रोजी मेक्सिकोतल्या गुआडलाला इथे अक्सेल तुझांबेने १००व्या मिनिटाला जमैकाविरुद्ध गोल केला. या गोलसह काँगोला १९७४ नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकपचं तिकीट मिळालं. काँगोची राजधानी असलेल्या किन्शासा शहरात जल्लोषाची लाटच उसळली. या क्षणासाठी त्यांनी ५२ वर्षांची प्रतीक्षा केली होती. सामना संपल्यानंतर सेड्रिक बाकामाबूने फिफाशी बोलताना सांगितलं की, जेव्हा आम्ही किन्शासाला परत जाऊ तेव्हा तिथलं वातावरण भारावून टाकणारं असेल.

सहा आठवड्यानंतर म्हणजेच १५ मे रोजी काँगोत इबोलाचा उद्रेक झाल्याचं जाहीर करण्यात आलं. १९७६ मध्ये इबोलाची ओळख जगाला झाल्यापासून १७व्यांदा काँगोत याचा प्रादुर्भाव झाला आहे. इबोलाचा हा विषाणू दुर्मीळ स्वरुपाचा आहे. यासाठी कोणतीही लस तसंच उपचार उपलब्ध नाहीत. हा उद्रेक बुंदीब्युगो प्रकाराचा आहे. ८ जूनपर्यंत काँगोच्या आरोग्य विभागाने ५१५ लोकांना इबोलाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट केलं. इबोलामुळे ९१ जणांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. २०१४-१६ या कालावधीत पश्चिम आफ्रिका प्रदेशात इबोलाने थैमान घातलं होतं. वेळीच काटेकोर काळजी घेतली नाही तर सध्याचा इबोला आणखी विनाशकारी होऊ शकतो असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यावेळच्या इबोला संसर्गात ११,००० जणांचा मृत्यू झाला होता. इबोलाचा प्रादुर्भाव युगांडातही झाला असून, तिथे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. युगांडा आणि काँगोची सीमा लागूनच आहे.

काँगो फुटबॉल संघासाठी इबोलाचा उद्रेक होणं नुकसानदायी होतं. काँगोच्या संघाने राजधानी किन्शासा इथे आयोजित सराव शिबीर रद्द केलं. संघ बेल्जियमला रवाना झाला. त्यांचे बहुतांश खेळाडू तिथेच जन्मलेले आहेत. ४ जून रोजी त्यांची डेन्मार्कविरुद्धची लढत ०-० अशी बरोबरीत सुटली. चिलीविरुद्धचा सराव सामना रद्द करण्यात आला. काँगोच्या खेळाडूंनी इन्डोअर लढतीसाठी विचारणा केली पण महापौरांनी नकार दिला. अखेर हा सामना फ्रान्समधल्या ओरलॅन्स इथे झाला.

वर्ल्डकपसाठी दाखल होण्यापूर्वी काँगो संघासाठी नियमावली तयार करण्यात आली. अमेरिकेत प्रवेश करण्यापूर्वी २१ दिवस बायोबबल मध्ये राहणं त्यांना अनिवार्य करण्यात आलं होतं. काँगोचे खेळाडू प्रदीर्घ काळ मायदेशी गेलेले नाहीत. आम्ही या अवघड परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे. आम्हाला काही अडचण नाही असं काँगोच्या कर्णधाराने सांगितलं.

१९७४च्या वर्ल्डकप स्पर्धेत काँगोचा संघ सहभागी झाला होता, तेव्हा देशाचं नाव झैर असं होतं. मोबूटू सेसे सेको यांचं जुलूमी प्रशासन तेव्हा काँगोत होतं. तो वर्ल्डकप दोन कारणांसाठी आठवणीत राहील. युगोस्लाव्हियाने काँगोचा ९-० असा धुव्वा उडवला. दुसरा प्रसंग म्हणजे ब्राझीलच्या फ्री किकवेळी म्वेपु इलुंगा बचावफळी सोडून चेंडू दूर भिरकावून देण्यासाठी जातानाचं दृश्य.

नंतर समोर आलेल्या घटनांचा मागोवा घेतला तर तो गोंधळापेक्षा निषेधच जास्त होता. मोबूटू यांनी खेळाडूंना तंबीच दिली होती. ब्राझीलविरुद्ध तीनपेक्षा जास्त गोल फरकाने हरलात तर मायदेशी तुम्ही सुखरुप पोहोचाल याची खात्री बाळगू नका. तुमच्या कुटुंबीयांनाही त्रास होऊ शकतो. ८५व्या मिनिटाला ब्राझीलचा संघ ३-० असा आघाडीवर होता. इलूंगाने जीवाच्या आकांताने चेंडूला भिरकावून दिलं. त्याने नंतर सांगितलं की रेड कार्ड हवं होतं. मैदानाबाहेर जाण्याचा त्याचा प्रयत्न होता. काँगोचा ०-३ असा पराभव झाला. संघ सुखरुप घरी परतला.

वर्ल्डकपची आठवण म्हणून ५२ वर्ष वाट पाहायला लागणं त्रासदायकच आहे. हा काँगोचा संघ वेगळा आहे. चान्सेल मबेमा याने १०७ लढतीत काँगोचं प्रतिनिधित्व केलं आहे. न्यूकॅस्टलकडून खेळणारा योन विसा त्यांचा स्ट्रायकर आहे. युरोपात लहानाचे मोठे झालेले आणि तिथल्या घोटीव फुटबॉल रचनेत तयार झालेले असंख्य खेळाडू काँगोच्या संघात आहेत. स्पर्धात्मक व्यावसायिक फुटबॉल लढतींचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.

१००व्या मिनिटाला तुझान्बेने गोल केला तेव्हा काँगोचा वारसा सांगणारा शिलेदार होता. त्याचं मैदानावर असणं काव्यगत न्याय म्हणायचं. नायजेरियाने तुझान्बेच्या पात्रतेवरच शंका उपस्थित केली. काँगोतील नियमांनुसार दुहेरी नागरिकत्व मिळू शकत नाही. त्यामुळे तुझान्बेचा सहभागच बेकायदेशीर आहे असं नायजेरियाचा आरोप होता. फिफाच्या शिस्तपालन समितीने नायजेरियाची तक्रार फेटाळली.

वेस्ट हॅम संघाचा राईट बॅक आरोन वान बिसाका याने सांगितलं की त्याला इंग्लंडसाठी खेळायचं आहे. २०१९ मध्ये तो इंग्लंडसाठी खेळण्याच्या उंबरठ्यावर होता. पण त्याला पुन्हा कधीही संधी मिळाली नाही. तो हौस्टनमध्ये असतो. काँगोचा संघ तिथेच आहे. पोर्तुगालशी खेळल्यानंतर त्यांचा सामना कोलंबियाशी आहे. त्याच स्टेडियममध्ये त्यांनी वर्ल्डकप पात्रतेसाठीचा सामना जिंकला होता. अटलांटा इथे त्यांची उझबेकिस्तानशी लढत होणार आहे.

चाहत्यांना फारसा धोका नाही पण काँगोच्या संघावर अपेक्षांचं दडपण आहे. संघर्षमय वाटचालीसह त्यांनी वर्ल्डकपचा मंच गाठला आहे.