Shaheen Afridi teased by Indian fans : टी-२० विश्वचषकात आज सर्वात रोमांचक सामना होत आहे. भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज थेट लढत होत आहे. न्यूयॉर्कमध्ये सायंकाळी ८ वाजता नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. मागच्यावेळेस जेव्हा टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीसमोर भारतीय फलंदाज गारद झाले होते. यावेळीही शाहीन आफ्रिदीवर सर्वांच्या नजरा असतील. तत्पूर्वी त्याचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय चाहते त्याला बॉलिंग कशी टाकावी, याचे सल्ले देत आहेत.

PHOTOS : IND vs PAK टी-२० विश्वचषकात आतापर्यंत सात वेळा आमनेसामने, पाहा दोन्ही संघांची कामगिरी

भारतीय चाहत्यांची आफ्रिदीला गळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय चाहते आफ्रिदीबरोबर सेल्फी घेताना दिसत आहेत. या चाहत्यांमधील एकजण सांगतो की, आम्ही पंजाबी आहोत आणि कॅनडाच्या वँकूवर येथून खास हा सामना पाहण्यासाठी आलो आहोत. शाहीन आफ्रिदीला भेटून आम्हाला आनंद होतोय. हा चाहता फोटो काढून जाता जाता शाहीन आफ्रिदीला म्हणतो, “लक्षात ठेव चांगली बॉलिंग करायची नाहीये आणि विराट-रोहितला तुझा मित्र समज.”

हा व्हिडीओ न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमधील असल्याचे दिसते. शाहीन आफ्रिदी याठिकाणी शॉपिंगसाठी आला असताना भारतीय चाहत्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यासह फोटो काढून घेण्याची संधी साधली.
या व्हिडीओमध्ये शाहिन आफ्रिदीही दिलखुलासपणे चाहत्यांच्या प्रतिक्रियेला दाद देताना दिसत आहे. चाहते थट्टा करतायत, हे त्याला कळतं, त्यामुळे तो हसून त्यांना दाद देतो.

टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठा सामना म्हणून आजच्या सामन्याकडे पाहिले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आजचा सामना होत आहे. यासाठी ३४ हजार प्रेक्षक बसतील, अशी सोयही करण्यात आली आहे. गट ‘अ’ मध्ये असलेल्या भारताने आयर्लंडशी पहिला सामना सहज जिंकला. तर पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात युएसए सारख्या नवख्या संघाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आज पाकिस्तान त्वेषाने उतरून विजय मिळविणार की भारत आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवणार, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतूर झाले आहेत.