विश्वविजेतेपदाचा कडवा दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघात दर्जेदार खेळाडूंचा भरणा असला तरी सध्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. बुधवारी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडपुढे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाचे आव्हान उभे ठाकले आहे.

२०१९मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बरोबरी झाली होती. त्यानंतर ‘सुपर ओव्हर’मध्येही बरोबरी झाल्यानंतर सीमारेषापार फटक्यांच्या नियमाच्या बळावर इंग्लंडने सरशी साधली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी न्यूझीलंडचा संघ उत्सुक आहे. न्यूझीलंडने या उपविजेतेपदानंतर काही महिन्यांपूर्वी भारताला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती.

इंग्लंडने ‘अव्वल-१२’ फेरीत दिमाखदार कामगिरी केली. अखेरच्या साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून पत्करलेला पराभव वगळला, तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या संघांना इंग्लंडने धूळ चारली. न्यूझीलंडनेही तोलामोलाची कामगिरी करताना पाकिस्तान वगळता ‘गट-२’मध्ये चार विजय संपादन केले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यावर मिळवलेले विजय न्यूझीलंडला उपांत्य फेरीत गाठण्यासाठी प्रेरक ठरले.

१३-७ इंग्लंड आणि न्यूझीलंड संघात आतापर्यंत २१ ट्वेन्टी-२० सामने झाले असून, यापैकी १३ सामने इंग्लंडने आणि ७ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत, तर एक सामना रद्द झाला होता.

३-२ ट्वेन्टी-२० विश्वचषकात उभय संघांत झालेल्या ५ सामन्यांपैकी ३ सामने इंग्लंडने आणि २ सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.

’ वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी