Sanjiv Goenka Memes: पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी केलेली तुफान फटकेबाजी ही लखनौ सुपर जायंट्स संघातील गोलंदाजांसाठी वाईट स्वप्नांपैकी कमी नव्हती. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय पूर्णपणे फसल. कारण पंजाबच्या फलंदाजांनी वादळी फटकेबाजी केली. प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोली हे दोन्ही फलंदाज लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले. दरम्यान या सामन्यानंतर संजीव गोयंका यांना ट्रोल करणारे मजेशीर मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागले आहेत.
प्रियांश- कुपरची स्फोटक फलंदाजी
पंजाब किंग्जला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. कारण प्रभसिमरन सिंग शून्यावर माघारी परतला होता. त्यानंतर कुपर कॉनोली आणि प्रियांश आर्यने मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून पावरप्लेमध्ये मिळून अवघ्या ६३ धावा जोडल्या. पण त्यानंतर चौकार- षटकारांचा पाऊस पाडून दोघांनी ९ व्या षटकात संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. दोघांनी मिळून १८२ धावांची रेकॉर्डब्रेकिंग पार्टनरशिप केली. दोघांनाही शतक झळकावण्याची संधी होती. पण दोघांचं शतक थोडक्यात हुकलं. प्रियांश आर्य ९३ धावांवर बाद झाला. तर कुपर कॉनोलीने ८७ धावांची खेळी केली.
भन्नाट मीम्स व्हायरल
पंजाबच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर, प्रियांश आर्य आणि कुपर कॉनोलीसह लखनौ सुपर जायंट्स संघाचे संघमालक संजीव गोयंका देखील तुफान चर्चेत आहेत. एका युझरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात संजीव गोयंकांचा फोटो शेअर केला आहे, या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी “कंट्रोल उदय कंट्रोल…” असं लिहिलं आहे. तर आणखी एका युझरने मोहम्मद सिराजचा एक फोटो शेअर करून त्यांना ट्रोल केलं आहे.
पंजाबने उभारला २५४ धावांचा डोंगर
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबकडून प्रभसिमरन सिंग शून्यावर माघारी परतला. प्रियांश आर्यने ९३ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान प्रियांश आर्यने अवघ्या १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर कुपर कॉनोलीने ८७ धावांची खेळी केली. मार्कस स्टोईनिसने २९ धावांची खेळी केली. नेहान वढेराने १३ धावा केल्या. शशांक सिंगने १७ धावा केल्या. पंजाबने २० षटकांअखेर ७ गडी बाद २५४ धावा केल्या.
