भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्या मालकीच्या वन८ कम्यून या रेस्तराँ चेनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण, त्याच्या या रेस्तराँवर LGBTQIA समाजाने आक्षेप घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी आपला आक्षेप नोंदवला असून येस, वी एक्झिस्ट या पेजवरुन ही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

त्यांचं म्हणणं काय आहे?

वन८ कम्यून या रेस्तराँच्या पुण्याच्या शाखेत या समाजासोबत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समुदायाप्रती या रेस्तराँचे धोरण भेदभावपूर्ण तसंच अस्वीकार्य असून त्याच्या इतर शाखांमध्येही असाच भेदभाव केला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, विराट कोहली, तुला माहित नसेल पण तुझं पुण्यातलं वन८ कम्यून हे रेस्तराँ LGBTQIA ग्राहकांसोबत भेदभाव करत आहे. इतर शाखांचंही असंच धोरण आहे. हे अनपेक्षित आणि अस्वीकार्य आहे. तुम्ही या धोरणात लवकरात लवकर बदल कराल अशी आशा आहे. एकतर रेस्तराँची भूमिका बदला किंवा अशा प्रकारे भेदभाव करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन काम करणे टाळा.

कशामुळे आहे हा आक्षेप?

विराटच्या मालकीच्या या रेस्तराँमध्ये LGBTQIA समाजातल्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. भिन्नलिंगी जोडपी किंवा महिला आणि पुरुषांनाच या रेस्तराँमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी पुण्यातल्या शाखेची भूमिका आहे. दिल्लीतल्या शाखेला संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही असं येस, वी एक्झिस्ट या पेजचं म्हणणं आहे. या रेस्तराँने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की रेस्तराँमध्ये ‘स्टॅग एन्ट्री’ प्रतिबंधित आहे. म्हणजेच एकट्या मुलाला रेस्तराँमध्ये प्रवेश नाही. या रेस्तराँच्या पुण्याच्या शाखेचे प्रमुख अमित जोशी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, आम्ही लिंगाच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही. आमच्याकडे स्टॅग एन्ट्रीवर निर्बंध आहेत. हे केवळ आवारात उपस्थित असलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आहे.