Cooper Connolly Six: आयपीएल २०२६ स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील शेवटच्या षटकात पंजाब किंग्ज संघाने विजय मिळवला आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना २२ वर्षीय कुपर कॉनोलीने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४४ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने पंजाब किंग्ज संघाने ३ गडी राखून विजयाची नोंद केली. या खेळीदरम्यान त्याने १०३ मीटर लांब षटकार खेचला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १६२ धावा केल्या. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीला आलेला प्रियांश आर्य स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कुपर कॉनोलीने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने अनुभवी गोलंदाज राशिद खानच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला.

वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर जागेहून लांब षटकार खेचणं इतकं जड जात नाही. कारण गोलंदाजीच्या गतीचा वापर करून सहज मोठा फटका मारता येतो. पण फिरकी गोलंदाजाविरूद्ध फलंदाजी करताना जागेहून मोठा फटका मारणं इतकं सोपं नसतं. पण कुपर कॉनोलीने राशिद खानच्या गोलंदाजीवर जागेवर उभं राहून १०३ मीटर लांब षटकार खेचला. तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाची गोलंदाजी सुरू असताना, ८ वे षटक टाकण्यासाठी राशिद खान गोलंदाजीला आला. या षटकातील दुसरा चेंडू कुपर कॉनोलीने लेग साईडच्या दिशेने पूर्ण ताकदीने मारला. हा १०३ मीटर लांब षटकार पाहून जगातील नंबर १ गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा राशिद खानही आश्चर्यचकीत झाला.

या सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १६२ धावा केल्या. गुजरातकडून फलंदाजी करताना शुबमन गिलने ३९ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने ३८ धावा केल्या. यासह ग्लेन फिलिप्सने २५ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून कुपर कॉनोलीने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने ३७ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १८ धावा केल्या. हा सामना पंजाबने ५ चेंडू शिल्लक ठेवून ३ गडी राखून आपल्या नावावर केला.