Cooper Connolly Litton das: बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत पराभव करत मोठा अपसेट केला. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील अखेरचा सामना जिंकत क्लीन स्वीप टाळला. २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १४९ धावांची दमदार खेळी साकारून कूपर कॉनोली ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यातील विजयाचा हिरो ठरला. आपल्या आक्रमक फलंदाजीने बांगलादेशी चाहत्यांना रोमांचित केल्यानंतर, लिटन दासला बाईक भेट देऊन त्याने सर्वांची मनं जिंकली.

कूपर कॉनोलीने १३४ चेंडूंत १४९ धावा केल्या, त्याच्या या खेळीत ६ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे पहिलंच शतक ठरलं आणि या कामगिरीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. तीन सामन्यांच्या या मालिकेत, तीन डावांमध्ये कॉनोलीने ६१.३३ च्या सरासरीने एकूण १८४ धावा केल्या. मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याला बक्षीस म्हणून एक बाईक मिळाली, जी त्याने लिटन दासला भेट दिली.

कुपर कॉनोलीने लिटन दासला बाईक का भेट दिली?

कूपर कॉनोलीने आपला पुरस्कार लिटन दासला भेट देणं हे खिलाडूवृत्तीचं उत्तम उदाहरण होतं. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान लिटन दासला क्रॅम्प्स येण्याचा त्रास झाला होता, ज्यामुळे त्याला नीट चालणंही कठीण झालं होतं; अशा वेळी कॉनोलीने पुरस्कार म्हणून मिळालेली बाईक लिटन दासला देत खेळाच्या उदात्त भावनेचं दर्शन घडवलं.

बांगलादेशने एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. पहिला सामना ८६ धावांनी जिंकून, बांगलादेशने २१ वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये पराभूत करण्याची कामगिरी केवळ दुसऱ्यांदा करून दाखवली. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून धुव्वा उडवला आणि या फॉरमॅटमधील त्या संघाविरुद्धचा आपला तिसरा विजय नोंदवला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ‘क्लीन स्वीप’ (सर्व सामने जिंकण्याची) करण्याची पहिलीच संधी होती, परंतु कूपर कोनोलीच्या शानदार शतकामुळे त्यांना त्यात यश आले नाही.