Cooper Conolly Creates history with Maiden Hundred: पंजाब किंग्स संघाला आयपीएल २०२६ मध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सनरायझर्स हैदराबादकडून पंजाबचा ३३ धावांनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. यासह आता पहिल्या स्थानी असणारा पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. पंजाब किंग्ससाठी अखेरच्या चेंडूपर्यंत एकटा कुपर कॉनोली लढत होता, यादरम्यान त्याने शतक खेळीही केली. या शतकाच्या बळावर त्याने मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

कुपर कॉनोलीने एका टोकाकडून विकेट्स पडत असताना एकट्याने झुंज देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने टी-२० कारकिर्दीतील त्याचं पहिलं शतक झळकावलं. हैदराबादने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात खूप खराब झाली आणि परिणामी संघाला ३३ धावांनी पराभवाला सामोर जावं लागलं.

कूपर कॉनोलीने एक शानदार खेळी केली. त्याने ५९ चेंडूंमध्ये सात चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट १८१.३५ होता. कूपर कॉनोलीने हे शतक अवघ्या २२ वर्षे आणि २५७ दिवसांच्या वयात पूर्ण केलं, ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण विदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम क्विंटन डी कॉकच्या नावावर होता, ज्याने वयाच्या २३ वर्षे आणि १२२ दिवसांत हा पराक्रम केला होता.

आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण विदेशी खेळाडू

२२ वर्षे २५७ दिवस – कूपर कॉनोली
२३ वर्षे १२२ दिवस – क्विंटन डी कॉक
२३ वर्षे १५३ दिवस – डेव्हिड वॉर्नर<br>२३ वर्षे ३३० दिवस – डेव्हिड मिलर
२३ वर्षे ३५२ दिवस – कॅमेरॉन ग्रीन

२२ वर्षीय कूपर कॉनोलीने आयपीएल २०२६ मध्ये आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे. तो सध्या या हंगामात पंजाबचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १० सामन्यांमध्ये ५३.८६ च्या सरासरीने ३७७ धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट १७१.३६ आहे, म्हणजेच तो प्रत्येक सामन्यात वेगाने धावा करत आहे. यापूर्वी त्याने लखनौविरुद्ध ८७ धावांची दमदार खेळी केली होती.