कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेतील २२ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी मैदानात उतरलेल्या अर्जेटिना संघाला पहिल्याच सामन्यात अपयश आले. तुलनेने कमकुवत असलेल्या पेराग्वे संघाने ०-२ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत अर्जेटिनाला २-२ असे बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.
इंग्लिश प्रीमिअर लीगचा स्टार खेळाडू सर्जिओ अ‍ॅग्युरो आणि कर्णधार लिओनेल मेस्सी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे अर्जेटिना विजयी सलामी देईल असे स्पष्ट चित्र मध्यंतरापर्यंत दिसत होते, परंतु विजयाचा निर्धार करून मैदानात उतरलेल्या पेराग्वेने करिष्माई कामगिरी केली. नेल्सन व्ॉल्डेज आणि ल्युकास बारीओस यांनी अनुक्रमे ६०व्या व ९०व्या मिनिटाला गोल करून अर्जेटिनाच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.
‘‘२-० अशा आघाडीनंतर आम्ही सामन्यावरील पकड गमावली, तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी संघाने सामना अनिर्णीत राखण्यासाठी चार ते पाच संधी मिळवल्या. पहिल्या सत्रात ज्या पद्धतीने संघाने खेळ केला, तो दुसऱ्या सत्रात त्यांना करता आला नाही.  तरीही आम्हाला विजयाची जास्त संधी होती,’’ असे मत अर्जेटिनाचे प्रशिक्षक गेराडरे माटिन्हो यांनी व्यक्त केले.
या सामन्यात नायक ठरलेल्या बारीऑसने हा आनंद शब्दात मांडणे अवघड असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘‘अर्जेटिनाचा संघ हा कडवा प्रतिस्पर्धी आहे. अखेरच्या क्षणाला या संघाला बरोबरीत रोखणे, ही बाब विजय मिळवण्यासारखीच आहे.’’ पेराग्वेसाठी पहिला गोल नोंदविणारा नेल्सन म्हणाला, ‘‘ अर्जेटिनासमोर एक खेळाडू म्हणून आम्ही कमकुवत आहोत, परंतु संघ म्हणून आम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहोत.’’
गतवर्षी विश्वचषक स्पध्रेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या अर्जेटिनाने १९९३मध्ये कोपा अमेरिकेचे जेतेपद पटकावले होते. पुढील लढतीत त्यांना गतविजेत्या उरुग्वेशी सामना करायचा आहे. उरुग्वेने पहिल्याच लढतीत जमैकन संघावर १-० असा सोपा विजय मिळवला. क्रिस्टियन रॉड्रिगेजने उरुग्वेसाठी विजयी गोल केला.

मंगळवारच्या लढती
इक्वेडोर विरुद्ध बोलोव्हिया
वेळ : मध्यरात्री २:३० वाजता
चिली विरुद्ध मेक्सिको
वेळ : पहाटे ५ वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी व सोनी किक्स