अर्जेटिनाची आज उरुग्वेशी लढत

साव पावलो : अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि उरुग्वेचा लुइस सुआरेझ यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पहाटे अर्जेटिना आणि उरुग्वे यांच्यात लढत रंगणार आहे.

अर्जेटिना आणि उरुग्वे या संघांना नोव्हेंबरनंतर आपल्या तीन सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही.  या सामन्यातील विजेता संघ अ गटातून अग्रस्थानी पोहोचणार आहे.

चिलीविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करल्याने अर्जेटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांच्यावर प्रचंड टीका झाली.  लुकास कार्टाच्या जागी मध्यरक्षक म्हणून ख्रिस्तियन रोमेरो याला खेळवण्यात येणार आहे.

उरुग्वेची मदार सुआरेझ आणि एडिन्सन कावानी यांच्यावर असून जिओवानी गोंझालेझ, पेनारोल, लुकास टोरेरा, रॉड्रिगो बेंटानकर, निकोलस डे ला क्रूझ, फेडेरिको वाल्वेर्डे, फाकुन्डो टोरेस आणि जोनाथन रॉड्रिगेझ यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

५३ जण करोनाबाधित

कोपा अमेरिका फु टबॉल स्पर्धेशी संबंधित ५३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे ब्राझिलच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बुधवारी या स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या २६ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले. व्हेनेझुएला संघातील तब्बल १२ जणांना आणि बोलिव्हियाच्या तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.