ब्राझीलच्या इस्टाडिओ नॅशनल स्टेडियमवर कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात रंगली. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने कोलंबियावर ३-२ अशी मात करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी साधली होती. पहिल्या सत्रात अर्जेंटिनाने आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात कोलंबियाने आक्रमक खेळ दाखवला. या आक्रमणामुळे कोलंबियाच्या एकूण सहा खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. अंतिम फेरीत अर्जेंटिना आता ब्राझीलशी टक्कर घेणार आहे. मेस्सी विरुद्ध नेमार अशी ही लढत होणार असून या सामन्याची उत्कंठा वाढली आहे.

पहिले सत्र

पहिल्या सत्राच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाने गोल करत आघाडी घेतली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीच्या असिस्टवर लोटारो मार्टिनेझने सातव्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. मेस्सीचा हा १५०वा सामना होता. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांपर्यंत कोलंबियाने अर्जेंटिनाचे आक्रमण रोखले. मेस्सीचा सहकारी गिवानी लो सेल्सोला पिवळे कार्ड दाखवण्यात आले.  त्यानंतर पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत कोलंबियाच्या जुवान कॉड्राडोला पिवळे कार्ड मिळाले.

 

दुसरे सत्र आणि पेनल्टी शूटआउट

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात कोलंबियाने अर्जेंटिनावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याचेच फलित म्हणून ६१व्या मिनिटाला कोलंबियाने लुईस डायझने गोल नोंदवत अर्जेंटिनाशी बरोबरी साधली. ६३व्या मिनिटाला कोलंबियाच्या मिगुएल बोर्जाला पिवळे कार्ड मिळाले. चढाओढीच्या प्रयत्नात दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना सावधानतेने खेळण्याचा इशारा देण्यात आला. ७२व्या मिनिटाला मोनिटेल आणि ८७व्या मिनिटाला रॉड्रिगेझ या अर्जेंटिनाच्या खेळाडूंना पिवळे कार्ड मिळाले. तर ७५व्या मिनिटाला मुनोझ आणि ८६व्या मिनिटाला एडविन कार्डोना या कोलंबियाच्या खेळाडूंना रेफरीने पिवळे कार्ड दाखवले. ८८व्या मिनिटाला कोलंबियाला अजून एक पिवळे कार्ड मिळाले. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना आघाडी घेता न आल्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत पोहोचला. पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाकडून लोटारो मार्टिेनेझ, लिएंड्रो पारेडेस आणि लिओनेल मेस्सी यांनी गोल केले. तर, कोलंबियाकडून मिगुएल बोर्जा आणि जुआन कॉड्राडो यांनाच गोल करता आले.

 

अर्जेंटिना आणि कोलंबियाचा स्पर्धेतील प्रवास

साखळी फेरीत अर्जेंटिनाने ३ सामन्यात विजय, तर एक सामना बरोबरीत सोडवला. उरुग्वेल, पॅराग्वेला, आणि बोलिवियाला त्यांनी  पराभूत केले आहे. तर चिलीविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने इक्वाडोरला ३-० ने पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. कोलंबियाने इक्वाडोर आणि पेरूला साखळी फेरीत पराभूत केले आहे. तर व्हेनेजुएलासोबतचा सामना बरोबरीत सुटला. दुसरीकडे ब्राझीलने कोलोम्बियाला २-१ ने पराभूत केले होते. उपांत्यपूर्व फेरीत कोलंबिया विरुद्ध उरुग्वे सामना चांगलाच रंगला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यावेळी कोलोम्बियाने सामना ४-२ ने जिंकला होता.

ब्राझील अंतिम फेरीत

कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना ब्राझील आणि पेरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पेरू ब्राझीलवर वरचढ ठरणार असे म्हटले जात होते, पण अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला १-० अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिनाशी झुंजावे लागणार आहे.