दक्षिण अमेरिकेतील प्रमुख संघांमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. अर्जेटिना, ब्राझील, कोलंबिया, उरुग्वे, पेरू, चिली यांसारखे तगडे संघ आणि लिओनेल मेस्सी, नेयमार, जेम्स रॉड्रिग्ज, अ‍ॅलेक्सिस संचेझ आणि एडिन्सन चव्हानी या स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी फुटबॉलप्रेमींना मिळणार आहे. मेस्सीचा सध्याचा फॉर्म पाहता अर्जेटिना कोपा अमेरिका स्पध्रेतील २२ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याच्या निर्धाराने मदानात उतरणार आहे.  
यजमान चिली विरुद्ध इक्वेडोर यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. ब्राझील संघही फिफा विश्वचषक स्पध्रेतील निराशाजनक कामगिरी मागे सारून नव्या जोमाने या स्पध्रेत खेळताना पाहायला मिळेल. सध्या फुटबॉल क्षेत्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ढवळून निघाले आहे. त्यामुळे ही स्पर्धा दक्षिण अमेरिकन संघटना सीओएनएमईबीओएल यांच्यासाठी दिलासादायक म्हणावी लागेल. अर्जेटिनाचा कर्णधार मेस्सी आणि ब्राझीलीयन नेयमार यांनी गतआठवडय़ात बार्सिलोना क्लबकडून खेळताना ऐतिहासिक विजय मिळवला होता. विजयाचा तोच आत्मविश्वास घेऊन दोघेही चिली येथे राष्ट्रीय संघाच्या सेवेसाठी दाखल झाले आहेत.
दहा क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या या दोन्ही खेळाडूंवर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. अर्जेटिनाकडून मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळण्याची मेस्सीची ही कदाचित अखेरची संधी असून शकते, त्यामुळे तो १९९३ नंतर संघाला जेतेपद पटकावून देण्यास उत्सुक आहे. ‘‘फिफा विश्वचषक स्पध्रेतील अंतिम सामन्यातील पराभवाच्या कटू आठवणी पुसून टाकण्यासाठी कोपा अमेरिका स्पध्रेचे जेतेपद जिंकावे लागेल. अर्जेटिनाच्या चाहत्यांनाही आम्ही जिंकावे असे वाटते आणि आम्ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याची जाण आहे. याहून अधिक चांगला सत्राचा शेवट होऊच शकत नाही,’’ असे मेस्सी म्हणाला.
ब गटात असलेल्या अर्जेटिनाची लढत शनिवारी पॅराग्वे संघाशी होणार आहे. याच गटात त्यांच्यासमोर गतविजेत्या उरुग्वे आणि जमैकाचे आव्हान असेल. नेयमारही विश्वचषक स्पध्रेतील कटू आठवणी पुसून ब्राझीलला जेतेपद मिळवून देण्याच्या निर्धारात आहे.

गटवारी
अ गट- चिली, मॅक्सिको, इक्वेडोर, बोलिव्हिआ
ब गट- अर्जेटिना, उरुग्वे, पॅराग्वे, जमैका
क गट- ब्राझील, कोलम्बिाया, पेरे, वेनेझुएला
सामना : चिली विरुद्ध इक्वेडोर
वेळ :  ४:४५ वाजता (शुक्रवारी पहाटे)  
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी, सोनी किक्स