रुईडियाझचा गोल निर्णायक; पंचांच्या वादग्रस्त निर्णयाचा फटका

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्यामुळे ब्राझीलसारख्या दिग्गज संघावर स्पध्रेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे कोपा अमेरिका शतकमहोत्सवी फुटबॉल स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेरूने अखेरच्या साखळी लढतीत ब्राझीलवर १-० असा आश्चर्यकारक विजय मिळवत ‘ब’ गटातून अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

१९८७नंतर ब्राझीलची कोपा अमेरिका स्पध्रेतील ही सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे. पाच वेळा विश्वविजेत्या ब्राझीलला २९ वर्षांपूर्वी साखळीचा अडथळा ओलांडता आला नव्हता.

‘ब’ गटातून विजेत्याच्या थाटात उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी ब्राझीलला पेरूविरुद्धचा सामना किमान बरोबरीत सोडवणे आवश्यक होते. मात्र सामना संपायला १५ मिनिटे बाकी असताना पेरू संघाला नशिबाने साथ दिली. पेरूच्या रॉल रुईडियाझने अँडी पोलोच्या क्रॉसवर ७५व्या मिनिटाला साकारलेला गोल निर्णायक ठरला. मात्र या गोलसाठी त्याने हाताचा वापर केल्याचा दावा ब्राझीलच्या खेळाडूंकडून करण्यात आला. रुईडियाझने गोल साकारल्यावर जल्लोश साजरा केला आणि उरुग्वेचे रेफ्री आंद्रेस कुन्हा यांनी तो गोल असल्याचा कौल दिला. मग ब्राझीलच्या खेळाडूंनी कुन्हा यांना घेराव घालून संतप्तपणे आपली बाजू मांडली आणि निर्णय बदलण्याची मागणी केली. मग कुन्हा यांनी हेडफोनद्वारे चौथ्या पंचांकडे दाद मागितली. या सर्व वादात चार मिनिटे गेली. दोन्ही संघांतील खेळाडू आपली बाजू मांडत होते. मात्र अखेरीस कुन्हा यांनी हा गोल योग्य असल्याचा निर्वाळा दिला.

विविध कोनांतील कॅमेऱ्यांचे रिप्ले पाहिल्यानंतर रुईडियाझने ब्राझीलचा गोलरक्षक एलिसन बेकरचा अडसर दूर करून नेटमध्ये गोल साकारण्यासाठी हाताचा वापर केल्याचे दिसत होते. ब्राझीलने मग अखेरच्या काही मिनिटांमध्ये बरोबरी करण्याच्या ईष्रेने जोरदार आक्रमण केले, पण ते अपयशी ठरले. भरपाई वेळेत ईलिआस त्रिनडेडला जवळून गोल नोंदवण्याची सुवर्णसंधी चालून आली होती, परंतु ती त्याने वाया दवडली.

आता उपांत्यपूर्व फेरीत पेरूचा कोलंबियाशी सामना होणार आहे. सामन्याचा निकाल वादग्रस्तरीत्या लागल्यामुळे ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले असले तरी प्रशिक्षक डुंगा यांच्यावर या अपयशाचे खापर फुटले जाण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जर्मनीकडून ब्राझीलने ७-१ असा मानहानीकारक पराभव पत्करला होता. त्यातून सावरण्याच्या निर्धारानेच ब्राझीलचा संघ कोपा अमेरिका स्पध्रेत उतरला होता. पहिल्या सामन्यात इक्वेडरविरुद्ध ०-० अशी बरोबरी झाल्यानंतर ब्राझीलने हैतीचा ७-१ असा धुव्वा उडवला होता.

  • आजचा सामना सकाळी ८ वाजता : उरुग्वे वि जमैका
  • उद्याचा सामना पहाटे ५.३० वा. : चिली वि. पनामा