Copa America: ‘या’ चार संघाची उपांत्य फेरीत धडक

कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील, पेरु, अर्जेंटिना आणि कोलोम्बिया संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ब्राझील, अर्जेंटिना हे संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Copa America Argentina
कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक (Photo- Copa America Twitter)

कोपा अमेरिका स्पर्धेत ब्राझील, पेरु, अर्जेंटिना आणि कोलोम्बिया संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन संघ या चषकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. उपांत्य फेरीत ब्राझील विरुद्ध पेरु आणि अर्जेंटिना विरुद्ध कोलोम्बिया सामना रंगणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत कोणते संघ पोहोचतील?, याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये आहे.

ब्राझील विरुद्ध पेरु

कोपा अमेरिका स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पहिला सामना ब्राझील विरुद्ध पेरु या संघात रंगणार आहे. हे दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा ब्राझीलने पेरूला ४-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे या सामन्यात ब्राझीलचं पारडं जड आहे. ब्राझीलने साखळी फेरीतील ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. वेनेजुएलाला (३-०), पेरुला (४-०) आणि कोलोम्बियाला (२-१) ने पराभूत केलं आहे. तर इक्वाडोरविरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. तसंच उपांत्यपूर्व फेरीत चिलेला १-० ने पराभूत करत ब्राझीलने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

पेरुला साखळी फेरीत ब्राझीलनं ४-० ने पराभूत केलं होतं. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांना आणखी ताकदीनं उतरावं लागणार आहे. पेरुनं साखळी फेरीत २ सामन्यात विजय, एका सामन्यात पराभव, तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे. कोलोम्बियाला (२-१) आणि वेनेजुएला (०-१) ने पराभूत केलं आहे. तर इक्वाडोरविरुद्धचा सामना २-२ ने बरोबरीत सुटला होता. उपांत्यपूर्व फेरीत पेरु विरुद्ध पॅराग्वे सामना रंगतदार ठरला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ गोल केले. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यावेळी पेरुने पेनल्टी शूटआउटमध्ये सामना ४-३ ने जिंकला. आता ६ जुलैला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

अर्जेंटिना विरुद्ध कोलोम्बिया

कोपा अमेरिका स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना हा अर्जेंटिना विरुद्ध कोलोम्बिया या दोन संघात रंगणार आहे. साखळी फेरीत अर्जेंटिनाने ३ सामन्यात विजय, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. उरुग्वेला (०-१), पॅराग्वेला (०-१) आणि बोलिवियाला (१-४) ने पराभूत केलं आहे. तर चिले विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने इक्वाडोरला ३-० ने पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

कोलोम्बियाचं या सामन्यातील कामगिरी पाहता अर्जेंटिनाचं पारड जड असल्याचं दिसत आहे. कोलोम्बियाने इक्वाडोर आणि पेरूला साखळी फेरीत पराभूत केलं आहे. तर वेनेजुएलासोबतचा सामना बरोबरीत सुटला आहे. दुसरीकडे ब्राझीलने कोलोम्बियाला २-१ ने पराभूत केलं होतं. उपांत्यपूर्व फेरीत कोलोम्बिया विरुद्ध उरुग्वे सामना चांगलाच रंगला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यावेळी कोलोम्बियाने सामना ४-२ ने जिंकला. आता ७ जुलैला अर्जेंटिना विरुद्ध कोलोम्बिया उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. त्यामुळे या दोन संघातून कोणता संघ अंतिम फेरी गाठतो, याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Copa america cup brazil vs peru and argentina vs colombia in semi final rmt

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या