संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात अर्जेटिंनाने ब्राझीलचा पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. यासोबतच लिओनेल मेस्सीचं आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. मार्काना स्टेडियममध्ये अर्जेटिना आणि ब्राझिल या दोन बलाढय़ संघांमध्ये होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सी आणि नेयमार आमनेसामने येणार असल्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अर्जेंटिनाने १-० ने ब्राझीलचा पराभव करत विजेतेपद मिळवलं.

Copa America : अर्जेंटिना २८ वर्षानंतर विजेता; गतविजेत्या ब्राझीलला चारली धूळ

ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवलं असलं तरी अर्जेंटिनाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवून देण्याचं मेस्सीचं स्वप्न अधुरं होतं. अर्जेंटिनाकडून एंजल डी. मारिया याने एकमेव गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. आणि शेवटी याच गोलमुळे अर्जेंटिनाचा विजय झाला. तब्बल २८ वर्षांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब जिंकल्याने अर्जेटिनाच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यापूर्वी १९९३ मध्ये अर्जेंटिनानं हा किताब आपल्या नावे केला होता.

विजयानंतर मेस्सी आणि त्याचे सहकारी खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करत होते. मात्र यावेळी एक भावनिक क्षणही पहायला मिळाला जो फुटबॉलच्या आणि खासकरुन मेस्सीच्या चाहत्यांना नेहमी लक्षात राहील.

परभव झाल्यानंतर नेमयार बार्सोलेनामधील आपला जुना सहकारी मेस्सीला शोधत अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे जाताना दिसत होती. एकमेकाला पाहिल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली, एकीकडे नेमयार मेस्सीचं अभिनंदन करत असताना दुसरीकडे मेस्सी त्याचं सांत्वन करताना दिसत होता.

भावना अनावर झालेल्या नेमयारचं मेस्सीकडून सांत्वन सुरु असताना दुसरीकडे अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडून सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी काही खेळाडू चुकून त्यांच्या अंगावर येत असताना मेस्सीने त्यांना रोखल्याचंदेखील व्हिडीओत दिसत आहे.

यापूर्वी १९९३ साली अर्जेंटिनानं ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनानं मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली आहे.