तब्बल २८ वर्षांची प्रतीक्षा संपवत अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळलेल्या अर्जेंटिनाने बलाढ्य ब्राझीलला १-०ने नमवले. अँजेल डि मारियाच्या गोलमुळे अर्जेंटिनाचे स्वप्न साकार झाले. सामना संपल्यानंतर लिओनेल मेस्सी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो मैदानावरच रडू लागला. १६ वर्षांच्या कारकीर्दीतील हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद होते.
मेस्सीने सामन्यानंतर विजयाचे क्षण कुटुंबीयांसह शेअर केले. त्याने पत्नी अँटोनेला रॅक्कुझो आणि आपल्या तीन मुलांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना आपले पदक दाखविले. अँटोनेलानेही हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोपा अमेरिकेत तीन फायनल गमावल्यानंतर अर्जेंटिनाने हे विजेतेपद जिंकले. संघातील खेळाडू इतके खूष झाले, की त्यांनी विजयानंतर मेस्सीला दहा फूट हवेत उडवत त्याच्या योगदानाला दाद दिली.
View this post on Instagram
View this post on Instagram
अंतिम सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही. पण तरीही त्याने गोल्डन बूट पुरस्कारासाठी नेमारला मागे टाकले. त्याने स्पर्धेत पाच गोल केले आणि तेवढेच असिस्टही केले.
हेही वाचा – विम्बल्डन : पुरुषांच्या महामुकाबल्यात महिला रचणार इतिहास, १४४ वर्षानंतर पहिल्यांदा ‘असे’ घडणार!
यापूर्वी १९९३ साली अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली.