प्रशांत केणी

खेळाडू आणि खेळाची संस्कृती यामुळे देशांची ओळख मागच्या शतकाच्या मध्यानंतर अधोरेखित व्हायला लागली. क्रीडा क्षेत्र हे जसे तंदुरुस्तीचे क्षेत्र, तसेच विजयाच्या ईर्षेने देशाचा अभिमान बुलंद ठेवणारे क्षेत्र. उत्साह, उत्कंठा, ऊर्जा, आत्मविश्वास, रणनीती, मनोधर्य, लक्ष्यप्राप्ती हे सारे क्रीडा क्षेत्राचे वैशिष्टय़, पण दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच क्रीडा क्षेत्र पूर्णत: ठप्प झाले आहे. पण या वेळी कोणतेही युद्ध घडले नाही, तर करोनानामक विषाणूच्या जैविक आपत्तीमुळे जगभरातील मैदाने झाकोळल्याने क्रीडा क्षेत्राची वाताहत झाली आहे.

करोनाचा जगभरातील प्रादुर्भाव वाढू लागल्याने टोक्योत जुलैमध्ये होणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वर्षभरात लांबणीवर पडली आहे. ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवल्यानंतर बऱ्याचदा त्या देशाचे अर्थकारण डबघाईस आल्याचे इतिहास सांगतो. वर्षभराच्या अंतराने होणाऱ्या स्पर्धेमुळे खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. युरो चषक स्पर्धेसह फुटबॉल जगतामधील अनेक चर्चित लीग खंडित झाल्या आहेत. बास्केटबॉलमधील ‘एनबीए’, टेनिसच्या विम्बल्डनसह अनेक स्पर्धा, प्रो हॉकी लीग यांच्यासह सर्वच क्रीडा प्रकारांना थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. कँडिडेटस बुद्धिबळ ही करोनामुळे स्थगित करण्यात आलेली अखेरची स्पर्धा ठरली. त्याअगोदरचे काही दिवस रिक्त मैदानांवर सामन्यांचे प्रयोग क्रिकेट, फुटबॉलसह काही क्रीडा प्रकारांत पाहावयास मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका मांडणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तारखा उलटून चालल्या आहेत. करोनाचे आक्रमण थांबल्यावर वर्षअखेरीस ‘आयपीएल’ तितक्याच झगमगटात होईल, याची शाश्वती नाही. आय लीग, इंडियन सुपर लीग, प्रो कबड्डी लीग यांच्यासारख्या अन्य क्रीडा प्रकारांच्या लीगनाही त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

लिओनेल मेसी, ख्रि्रस्तियानो रोनाल्डो, नेयमार, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल यांच्यासारख्या जागतिक क्रीडा क्षेत्रातील बहुचर्चित खेळाडूंच्या मानधनाची आणि वार्षिक उत्पन्नांची चर्चा क्रीडा क्षेत्रात नेहमीच असायची. भारतात ‘आयपीएल’मधील खेळाडूंचा लिलाव तसेच विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, पी. व्ही. सिंधू यांचे उत्पन्न चर्चेत असायचे. जागतिक क्रीडा क्षेत्रात खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू आणि उत्पन्न त्यांना ‘फोर्ब्स’च्या यादीतही अभिमानास्पद स्थान मिळवून द्यायचे, पण करोनामुळे महिन्याभरातच जागतिक क्रीडा क्षेत्रात मंदीचे ढग जमा झाले आहेत. वेतनकपातीची झळ नामांकित क्लब्ज आणि खेळाडूंना आतापासूनच लागू लागली आहे.

मैदानावर क्रिकेट परतायला किमान सहा महिने तरी लागतील, असा इशारा माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी दिला आहे. कोणत्याही खेळांचे सामनेच नसल्यामुळे खेळाडूंच्या वेतनावरही त्याचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. या कठीण कालखंडात नामांकित खेळाडू तरतील, परंतु जागतिक क्रमवारीत १००च्या पुढील क्रमांकांवर असलेल्या टेनिसपटूंना मात्र झगडावे लागेल, हे वास्तव माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी मांडले आहे. अन्य क्रीडा प्रकारांमध्येही स्थिरावलेले नामांकित खेळाडू सावरतील, पण नव्याने कारकीर्द सुरू झालेल्या आणि गरजेपलीकडे उत्पन्नाचा आकडा नेऊ न शकलेल्या खेळाडूंसाठी मात्र हा कालखंड कठीण असेल. खेळ मैदानावर जरी खेळला जात असला, तरी मैदानी कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत असते. यापैकी बहुतेकांचे पोट हे रोजंदारीवर असते. त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे.

निवृत्तीच्या उंबरठय़ावरील अनेक क्रीडापटूंना टाळेबंदी आणि त्यानंतर मैदानांवर सामने सुरू व्हायला लागणारा अवधी यामुळे कारकीर्द संपण्याची चिंता वाटू लागली आहे. काळ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे भारताचा तिरंदाज तरुणदीप राय म्हणतो. महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्याने कारकीर्दीतील एक वर्ष वाया जाणार आहे. पुढील वर्षी मी वर्षभराने मोठा म्हणजेच ३७ वर्षांचा असेन. मग वयपरत्वे माझ्या खेळावरही हा परिणाम होईल, अशी खंत तरुणदीपने मांडली.

क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा तोटा हा थेट प्रक्षेपणासाठी सामनेच नसल्यामुळे होणार आहे. जागतिक क्रीडा अर्थकारणाला जसा त्याचा फटका बसेल, तसाच देशातही त्याचे गंभीर परिणाम होतील. भारताने २५ जून १९८३ या दिवशी लॉर्ड्सवर विश्वचषक उंचावला आणि येथूनच क्रीडा प्रक्षेपणाचे माहात्म्य अन् त्याचे अर्थकारण भारताला कळू लागले. गेल्या ३७ वर्षांत देशात स्टार स्पोर्ट्स, सोनी या मातब्बर प्रक्षेपण कंपन्यांसह ३०हून अधिक क्रीडावाहिन्या कार्यरत आहेत. या वाहिन्यांवर सध्या ऐतिहासिक सामन्यांना उजाळा दिला जात आहे.

एकंदरीतच हा ‘करोनाझाकोळ’ हा उद्ध्वस्त करणारा आहे. यात विम्बल्डन स्पर्धेप्रमाणेच काही खेळाडू किंवा क्रीडा प्रकारांना विमा किंवा करारांमुळे दिलासा मिळू शकेल. जगभरातील मैदानांना विलगीकरण केंद्रांनी व्यापले आहे. अनेक खेळाडू फक्त आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता मदतकार्यात सामील झाले आहेत. खेळाडू, क्रीडा प्रकार आणि संघटनांसाठी ही ऑलिम्पिक किंवा विश्वचषकाप्रमाणेच आयुष्यातील सर्वात मोठी लढत आहे, कारण पृथ्वीतलावरील मानवी जीवन वाचवणे, हेच आता सर्वापुढील प्राथमिक लक्ष्य आहे. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे क्रीडा क्षेत्रसुद्धा या करोनाच्या महासंकटातून सावरेल, अशी आशा आहे.

prashant.keni@expressindia.com