पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोनाल्डोचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो बुधवारी स्विडनविरुद्ध होणाऱ्या नेशन्स लीग सामन्याला मुकावे लागणार आहे. “पोर्तुगाल आणि जुव्हेंटस क्लबचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला असला तरी त्याला करोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तो सध्या विलगीकरणात असून त्याची प्रकृती उत्तम आहे”, अशी माहिती पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशनने (PFF) निवेदनाद्वारे दिली.

क्रिस्टियानो रोनाल्डोने कालच (सोमवारी) एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोत तो त्याच्या संघासोबत एका मोठ्या जेवणाच्या टेबलावर भोजनाचा आस्वाद घेत होता. मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी एकत्रित असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं होतं.

रोनाल्डोचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संघाच्या उर्वरित खेळाडूंचीही करोना चाचणी मंगळवारी करण्यात आली. या चाचणीत इतर साऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे लिस्बन येथील ‘ग्रुप ए 3’ सामन्यासाठी सर्व खेळाडू उपलब्ध असणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.