करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. प्रतिष्ठेची ऑलिम्पिक स्पर्धादेखील वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली. टोक्यो येथे २०२० मध्ये ही स्पर्धा रंगणार होती, पण करोनामुळे ती आता २०२१ ला आयोजित करण्यात येणार आहे.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

ऑलिम्पिकसाठी आता एक वर्ष वाट पाहावी लागणार असतानाच दुष्काळात तेरावा महिना आल्याप्रमाणे गोष्ट घडली. टोक्यो ऑलिम्पिक २०२० आणि पॅरालिम्पिक आयोजन संस्थेच्या सदस्याची करोना व्हायरस चाचणी सकारात्मक म्हणजेच पॉसिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. समितीच्या मुख्यालयात काम करणाऱ्या तिशीच्या आसपासच्या वयोगटातील एका व्यक्तीची मंगळवारी चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने त्याला त्याच्या घरात विलगीकरण (क्वारंटाइन) करून ठेवण्यात आले असल्याची माहिती आहे.

तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडलो – विराट कोहली

महिन्याच्या सुरुवातीला जपान सरकारने आपात्कालीन स्थितीची घोषणा केल्यापासून टोक्यो ऑलिम्पिक २०२० समितीमधील अंदाजे ३,८०० कर्मचारी घरून काम करत आहेत. मागील महिन्यात करोनाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळही पुढे ढकलण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्याच्याच आयोजन समितीचे सदस्य पुनर्निर्धारित ऑलिम्पिकच्या योजनांवर काम करीत आहेत. याचदरम्यान, आयोजन समितीतील सदस्याला करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.