फिफाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर स्वित्र्झलड अ‍ॅटर्नी जनरल अधिकाऱ्यांनी (ओएजी)२०१८ आणि २०२२ विश्वचषक आयोजन प्रक्रियेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या विश्वचषक आयोजनाच्या लिलाव प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार करून हा मान रशिया व कतार यांना देण्यात आला होता का, याच्या तपासासाठी दहा जणांची कसून चौकशी सुरू आहे. या लिलाव प्रक्रियेत या दहा जणांनी मतदान केले होते.
बुधवारी स्वित्र्झलडच्या अधिकाऱ्यांनी येथील पंचतारांकित
हॉटेलमध्ये छापा टाकून फिफा अधिकाऱ्यांना अटक केली आणि त्या छाप्यात त्यांनी काही इलेक्ट्रॉनिक डाटा व कागदपत्रे जप्त केले आहेत. त्याचा वापर पुरावा म्हणून या प्रकरणात करण्यात येणार आहे. तसेच २०१० साली झालेल्या लिलाव प्रक्रियेदरम्यानच्या व्यवहारांची माहितीही बँकेकडून मिळवण्यात आलेली आहे.

दोषी अधिकाऱ्यांची यादी
*जेफरी वेब : फिफाचे उपाध्यक्ष आणि सेंट्रल अमेरिका व कॅरेबिन असोसिएशन फुटबॉलचे (सीओएनसीएसीएएफ) कार्याध्यक्ष. कायमन आयलॅण्ड फुटबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष.

*इयुगेनिओ फिगुएरेडो :  माजी फुटबॉलपटू आणि सध्या युरुग्वे फुटबॉल असोसिएशनचे अधिकारी. दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशनचे माजी कार्याध्यक्ष.

*जॅक वॉर्नर : फिफाचे माजी उपाध्यक्ष. २०११ साली आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा देईपर्यंत सीओएनसीएसीएएफ (त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो विभाग) कार्याध्यक्ष.

*एडय़ुआडरे ली : फिफा कार्यकारणी सदस्य. कोस्टा रिकन फुटबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष.यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टा रिकाने गतवर्षी १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे आयोजन केले.

*जुलीओ रोचा : फिफाच्या भविष्यातील प्रकल्पांचे आयोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी रोचा यांच्याकडे होती. सेंट्रल अमेरिकन फुटबॉल युनियनचे माजी कार्याध्यक्ष.

*राफेल एस्क्वीवेल : १९८८ पासून वेनेझुएलान फुटबॉल फेडरेशनचे कार्याध्यक्ष. फिफा शिस्तपालन समितीचे सदस्य. १९४६ साली स्पेनमध्ये जन्मलेल्या एस्क्वीवेल यांच्या कुटूंबाचे १९५० साली वेनेझुएला येथे स्थलांतर.

*जोस मारिआ मारिन : ब्राझिल फुटबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष. ऑलिम्पिक फुटबॉल स्पध्रेच्या फिफा आयोजन समितीचे सदस्य. २०१२ च्या युवा फुटबॉल स्पध्रेत पदक चोरण्याचा आरोप.

*निकोलस लेओझ : माजी क्रीडा पत्रकार आणि १९८६ ते २०१३ या कालावधीत दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष. २००८मध्ये ७ लाख युरो डॉलरची लाच घेतल्याचा ठपका.

*कोस्टास टक्कास : जेफरी वेब यांचे सल्लागार.  कायमन आयलॅण्ड फुटबॉल असोसिएशनचे माजी सहसचिव. सोनेम टेक्नॉलॉजी आणि मायनिंग कंपनीत कार्यरत.