टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ५३ किलो वजनी गटात पदकाची आशा असणारी कुस्तीपटू विनेश फोगाट उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. विनेशला गुरुवारी सकाळी मकुहारी मेस्से हॉलमध्ये बेलारूसच्या व्हेनेसा कलाडझिंस्कायाच्या हातून ३-९ असा पराभव स्वीकारावा लागला. आपल्या मैत्रिणीच्या पराभवानंतर मागील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक निराश झाली आहे.

हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम-८ सामन्यात बेलारूसच्या कुस्तीपटूविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही. तिला व्हेनेसाविरुद्ध बचाव करावा लागला. पराभव झाला असला तरी विनेशला पदकाची आशा होती. ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या नियमानुसार, अंतिम फेरीतील स्पर्धकांविरुद्ध पराभूत झालेल्यांना कांस्य पदकासाठी लढण्याची संधी असते. पण व्हेनेसाला उपांत्य फेरीचा चीनच्या पांग कियान्यूकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विनेशचा टोक्यो ऑलिम्पिकमधील प्रवास संपला.

हेही वाचा – Tokyo 2020 : व्वा..! ‘चंदेरी’ कामगिरी केलेल्या कुस्तीपटू रवी दहियानं दिली सोन्यासारखी प्रतिक्रिया

विनेश स्पर्धेबाहेर पडल्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षीला रडू कोसळले. ती म्हणाली, “मी माझे अश्रू आवरू शकले नाही. मी उपांत्य फेरीचा सामना पाहिला आणि मला आता कसे वाटत आहे, ते सांगू शकत नाही. कुस्तीमध्ये आपल्यासाठी वाईट दिवस होता. विनेश रिओ ऑलिम्पिकमध्ये दुखापतग्रस्त झाली होती. त्यावेळी ती खूप निराश झाली होती. पण त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले आणि टोक्यो ऑलिम्पिकसाठी खूप मेहनत घेतली. पण आता तिला कसे वाटत असेल, याची मी कल्पनाही करू शकत नाही.”

भावूक झालेली साक्षी म्हणाली, ”विनेश आपली पदकाची प्रबळ दावेदार होती. आम्ही अजूनही विश्वास ठेवू शकत नाही, की ती हरली आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. मी आता विनेशशी बोलणार आहे.” विनेशने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली होती. तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती स्वीडनच्या सोफिया मॅग्डालेना मॅटसनला तिच्या पहिल्या लढतीत ७-१ने पराभूत केले होते.