County Championship: भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ससेक्स क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. सध्या ससेक्स आणि मिडलसेक्स क्रिकेट क्लब दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती सामना सुरू आहे. या सामन्यात पुजाराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने बुधवारी (२० जुलै) ससेक्ससाठी हंगामातील तिसरे द्विशतक झळकावले. गेल्या १०८ वर्षांमध्ये ससेक्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर क्रिकेटची पंढरी अशी ओळख असणाऱ्या लॉर्ड्सवर द्विशतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड एजबस्टन कसोटी सामन्यासाठी तो भारतीय संघात दाखल झाला होता. कसोटी सामना संपल्यानंतर तो पुन्हा ससेक्समध्ये परत गेला. पुन्हा ससेक्समध्ये दाखल झाल्यानंतर त्याने पहिल्या सामन्यात केवळ ४६ धावा केल्या होत्या. मात्र, मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार खेळ केला. पुजाराने ४०३ चेंडूमध्ये २३१ धावांची खेळी केली.

या लढतीमध्ये पुजाराकडे ससेक्सच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. कारण, संघाचा नियमित कर्णधार टॉम हेन्स दुखापतीमुळे सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे ससेक्सचा कर्णधार म्हणूनही पुजाराचे पहिल्याच सामन्यात द्विशतक झाले आहे. यापूर्वी याच हंगामात पुजाराने नाबाद २०१ आणि २०३ धावांच्या खेळी केल्या आहेत. ससेक्सकडून खेळताना पुजाराने या हंगामातील सात सामन्यांमध्ये ९५० हून अधिक धावा केल्या आहेत.

हेही वाचा – India Tour of West Indies : भारतीय क्रिकेटपटूंची शाही बडदास्त; एका फ्लाईटसाठी बीसीसीआयने खर्च केले तब्बल ३.५ कोटी रुपये

काउंटी क्रिकेटच्या जोरावरच पुजाराचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले होते. खराब कामगिरीमुळे पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. संघातून वगळल्यानंतर त्याने ससेक्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती.