CPL 2026, Johnson Charles Wicket Controversy: वेस्ट इंडिजमध्ये सध्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत आतापर्यंत चौकार- षटकार आणि रेकॉर्ड्सचा पाऊस पाहायला मिळाला आहे. पण मंगळवारी झालेल्या सामन्यात जे काही घडलं , ते पाहून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. या सामन्यात बार्बाडॉस ट्रायडंट्स आणि सेंट किंट्स अँड्स नेव्हिस हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. क्रिकेटमध्ये फलंदाज बाद झाला आणि त्याने एकदा मैदान सोडलं की सोडलं, मग तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही. पण या सामन्यात भलतंच काही घडलं.

तर झाले असे की, बार्बाडॉसचा संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना या संघाने २० षटकांअखेर ४ गडी बाद २१७ धावा केल्या. बार्बाडॉस संघाकडून फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. तर झॅकॅरी कार्टरने ५७ धावा केल्या. तर शेरफेन रुदरफोर्डने शेवटी फलंदाजी करताना अवघ्या १६ चेंडूंमध्ये २६ धावांची खेळी केली.

जॉन्सन चार्ल्सच्या विकेटवरुन पेटला वाद…

हा सामना सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघाने ६ गडी आणि ५ चेंडू राखून आपल्या नावावर केला. यादरम्यान जॉन्सन चार्ल्स सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघाच्या विजयाचा हिरो ठरला. या सामन्यात त्याने ४५ चेंडूंचा सामना करत ७८ धावांची खेळी केली. पण जॉन्सन चार्ल्स आणि आपल्या फलंदाजीमुळे कमी आणि विकेटमुळे जास्त चर्चेत राहिला. तर झाले असे की, डावातील चौथ्या षटकात रॅमोन सायमंड्स गोलंदाजीला आला. या षटकात सायमंड्सने टाकलेला फुलटॉस चेंडू जॉन्सनने स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला, चेंडू हवेत गेला आणि रुदरफोर्डने झेल घेतला. तो बाद झाला पण सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यांना वाटत होतं की हा नो बॉल आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेतली. रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद घोषित केलं.

तिसऱ्या पंचांनी बादचा निर्णय दिल्यानंतर सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघातील खेळाडूंनी डगआऊटमधूनच संताप व्यक्त केला. पंचांनी व्हिडीओ पुन्हा एकदा तपासून पाहावा आणि मगच काय तो निर्णय द्यावा, यासाठी सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघातील खेळाडूंनी आरडाओरडा सुरू केला. पण आधी बाद घोषित केल्यानंतर चार्ल्सने मैदान सोडलं होतं. तरीदेखील सेंट किंट्स अँड्स नेव्हिस संघातील खेळाडू त्याला पुन्हा मैदानात जा असं सांगताना दिसून आले. खेळाडूंनी गोंधळ घातल्यानंतर, पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल तपासून पाहिला. रिप्लेमध्ये नो बॉल असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे बाद घोषित करण्यात आलेला चार्ल्स पु्न्हा मैदानात आला आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.