scorecardresearch

विराटच प्रशिक्षक ठरवणार असेल तर सचिन, गांगुली, लक्ष्मणची गरज काय?: गावसकर

गावसकर यांचा विराटवर थेट निशाणा

विराटच प्रशिक्षक ठरवणार असेल तर सचिन, गांगुली, लक्ष्मणची गरज काय?: गावसकर
सुनील गावसकर (संग्रहीत छायाचित्र)

अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादावर भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी भाष्य केले आहे. ‘जर कर्णधाराची पसंती आणि नापसंती इतकी महत्त्वाची असेल, तर मग क्रिकेट सल्लागार समितीचे कामच काय?’, असे म्हणत गावसकर यांनी विराट कोहलीला थेट लक्ष्य केले आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीत माजी क्रिकेटपूट सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. भारतीय संघासाठी नवा प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी याच समितीकडे आहे.

लंडनमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान क्रिकेट सल्लागार समितीने विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. अनिल कुंबळे प्रशिक्षकपदी कायम राहावेत, असा सल्ला सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिला होता. मात्र या तिघांचा सल्ला कोहलीने अमान्य केला. सुनील गावसकर यामुळे नाराज झाले आहेत. ‘जर संघातील कर्णधार आणि खेळाडूंच्या पसंतीनेच प्रशिक्षक निवडायचा असेल, तर मग क्रिकेट सल्लागार समितीचा उपयोग काय?,’ असा रोखठोक सवाल गावसकर यांनी उपस्थित केला आहे.

‘संघाच्या कर्णधाराच्या पसंतीनेच प्रशिक्षक ठरवला जाणार असेल, तर वेस्ट इंडिजमध्ये उपस्थित असलेल्या कर्णधार विराट कोहलीलाच कोणाची निवड करायची, याबद्दल विचारावे. यामुळे खूप लोकांच्या वेळेची बचत होईल,’ असे म्हणत सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. विराट कोहली आणि अनिल कुंबळे वादात सुनील गावसकर यांनी कुंबळेची बाजू लावून धरली आहे. या सर्व प्रकरणावर विराट कोहलीने आपली बाजू मांडावी, असे आव्हानदेखील गावसकर यांनी केले आहे.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामध्ये गेल्या ६ महिन्यांपासून वाद सुरु होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आधी हा वाद समोर आला. भारताला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत तब्बल १८० धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र या सामन्यानंतर अनिल कुंबळे यांनी कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडूंना धारेवर धरले. संघातील एकाही खेळाडूची कामगिरी अंतिम सामन्याला साजेशी झाली नाही, अशा शब्दांमध्ये कुंबळेने सर्व खेळाडूंची खरडपट्टी काढली होती. यानंतरच कुंबळेने संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करुनही संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नव्हता, या गोष्टीचा कुंबळे यांना प्रचंड राग आला होता. भारतीय खेळाडू मैदानावर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत मजामस्ती करण्यात मग्न होते. यावरुन संतापलेल्या अनिल कुंबळे यांनी खेळाडूंना सुनावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या