करोनामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. मात्र करोनाचं संकट पाहता आयोजकांनी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

‘करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.

कौतुकास्पद! विनामुल्य Oxygen Concentratorसाठी सेहवागने सुरू केला हेल्पलाइन नंबर

भारतीय संघाच्या व्यस्त नियोजनामुळे आशिया कपवर अनिश्चिततेचं सावट होतं. भारतीय संघ जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे आयोजकांना मोठं नुकसान झालं असतं असंही सांगण्यात येत आहे.

टी-२० वर्ल्डकपचं भवितव्य काय? BCCI ‘या’ तारखेला घेणार बैठक

भारताने आतापर्यंत ७ वेळा आशिया कपवर नाव कोरलं आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६ आणि २०१८ साली भारताने आशिया कप जिंकला आहे. २०१८ मध्ये आशिया कपचं आयोजन यूएईत करण्यात आलं होतं. २०१८ साली भारताने बांगलादेशला नमवून चषक आपल्या नावावर केला होता.