Cricket Australia Offer To Pat Cummins: पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याची नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने देखील आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने दमदार विजयाची नोंद केली. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. सध्या जगभरात फ्रेंचायझी क्रिकेटचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे खेळाडू फ्रेंचायझी क्रिकेटकडे आकर्षित होत आहेत. काहींनी तर कमी सामने आणि जास्त पैसा मिळतो म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन फ्रेंचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान स्टार खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय ठेवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे.
सिडनी हेराल्डच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व करण्यासाठी पॅट कमिन्सला १२ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ८२ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे. पॅट कमिन्सने २०२९ पर्यंत ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळायला प्राधान्य द्यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, गेल्यावर्षी पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेडला एका आयपीएल स्पर्धेतील फ्रेंचायझीकडून ऑफर देण्यात आली होती. दोघांनाही १० मिलियन डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून पूर्णवेळ फ्रेंचायझी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी देण्यात आली होती. आधी काही मोजक्याच स्पर्धा होत होत्या. पण आता प्रत्येक देशाची वेगळी टी -२० लीग आहे.
वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य न देता, फ्रेंचायझी क्रिकेटला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे काही खेळाडूंनी खूप लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला हे नको आहे. हे रोखण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही ऑफर दिली असल्याचं म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना मोठी ऑफर देऊन फ्रेंचायझी क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड हे दोघेही आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. पॅट कमिन्स या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी इशान किशनने संघाचं नेतृत्व केलं होतं. आता तो परतला असून त्याने पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकारली आहे.
