दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर पहिला दिवस सलामीवीर मुरली विजय आणि विराट कोहलीनं गाजवला. भारताच्या धावफलकावर २ बाद ७८ धावा असताना या जोडीनं २८३ धावांची दमदार भागीदारी करत श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मुरलीनं नागपूरच्या मैदानातील शतकी खेळीनंतर दिल्लीमध्ये सलग दुसरे शतक साजरे करत कारकिर्दीतील ११ व्या शतक साजरे केले. तर कर्णधार विराटनेही आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून देत नाबाद शतकी खेळी केली.

श्रीलंकेविरुद्धच्या शतकी खेळीनंतर विजय मुरलीनं कर्णधार विराट कोहलीच्या साथीनं वेस्ट इंडिज स्टाईलमध्ये सिलेब्रेशन केले. क्रिकेटच्या मैदानात वेस्ट इंडिज खेळाडू नृत्याचा अविष्कार दाखवत आनंद व्यक्त करताना बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. मुरलीनं अगदी अशाच अंदाजात आनंद साजरा केला. त्यानंतर विराट कोहलीनं गळाभेट घेत मुरलीचे अभिनंदन केले. एवढेच नाही तर त्यानेही त्याला साथ दिली. मैदानातील या प्रसंगाचा प्रेक्षकांनीही आनंद घेतला.

पहिल्या दिवसाखेर ही जोडी नाबाद राहिल असे वाटत असताना, लक्षन संदाकान याने मुरली विजयला बाद केले. यष्टिमागे निरोशान डिक्वेलाने चपळाई दाखवत त्याला यष्टिचित केले. यापूर्वी नागपूरच्या सामन्यात मुरलीने शतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीत त्याने २२१ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२८ धावांची खेळी केली होती. यासामन्यातही परेराच्या चेंडूवर निरोशान डिक्वेलानेच त्याचा झेल टिपला होता. नागपूरच्या कसोटीत द्विशतकानंतर कोहली दिल्लीच्या मैदानातही चमकला. दोघांनी भारताला मजबूत स्थितीत आणले.