Fans Reaction On Vaibhav Sooryavanshi Dropped: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बेलफास्टच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून होतं, कारण १५ वर्षांचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. पण असं काहीच झालेलं नाही. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याला वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर श्रेयस अय्यरने नाही असं सांगितलं. दरम्यान वैभव खेळणार नसल्याची माहिती मिळताच, क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सर्वच क्रिकेट चाहते वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत होते. इतकेच नव्हे, तर १५ वर्षांचा वैभव पदार्पण करणार म्हणून सामन्याची तिकिटं सोल्ड आऊट आणि मैदान फुल हाऊस झालं होतं. पण त्याचं पदार्पण काही झालेलं नाही. एका युझरने पोस्ट करत म्हटले की, “जर वैभव सूर्यवंशी हा सामना खेळणार नसेल, तर आम्ही सामना पाहणारच नाही.” तर आणखी एका युझरने पोस्ट करत लिहिले की, “त्यांना हे नकोय की, वैभवने आपल्या पाहिल्याच सामन्यात २०० धावांची खेळी करावी.” तर आणखी एका युझरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “वैभव फक्त पोस्टर बॉय आहे. त्याला प्लेईंग ११ मध्ये खेळणार नाही.”

नाणेफेकीवेळी कर्णधार श्रेयस अय्यरने वैभवला न खेळवण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “नाही, तो अप्रतिम आणि स्फोटक फलंदाज आहे. पण आमच्या संघात एकापेक्षा एक अनुभवी खेळाडू आहेत. या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मला वाटतं, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याला संधी नक्की मिळेल.”

आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): टीम टेक्टर, रॉस एडेअर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक/कर्णधार), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लिआम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेज, जय मूंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा